कसोटी क्रिकेटसाठी प्रतिकूल खेळपट्टीची निर्मिती करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने कडाडून टीका केली. याचप्रमाणे भारताला मनमानी करू देणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) धोरणाचीही निर्भत्र्सना केली.

मोटेराच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून १० गडी राखून पराभव पत्करल्याने इंग्लंडचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पिछाडीवर पडला आहे. त्यानंतर दोन दिवसांत सामना संपवण्याची किमया साधणाऱ्या खेळपट्टीवर वॉनने ताशेरे ओढले. ‘‘भारतासारख्या सामर्थ्यवान राष्ट्राबाबत ‘आयसीसी’ मौन बाळगते. त्यामुळे कसोटी क्रिकेटचे मोठे नुकसान होते आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर खेळपट्टीवर टीका करण्याऐवजी यशाचे श्रेय भारताच्या फिरकी गोलंदाजांना देतात, हे खेदजनक आहे,’’ असे वॉनने म्हटले आहे.

सामने कमी दिवसांत संपणार असतील, तर प्रक्षेपणकर्ते कराररकमेतून परतावा मागतील, असा इशारा २००३ ते २००८ या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या वॉनने दिला आहे. ‘‘प्रक्षेपणकत्र्यांचे तीन दिवस रिक्त जात आहेत, परंतु तरीही निर्मितीचे पैसे त्यांनी मोजले आहेत. यापुढे अशा प्रकारच्या खराब खेळपट्ट्या तयार करणाऱ्या क्रिकेट मंडळांबाबत त्यांना पुनर्विचार करावा लागेल,’’ असे वॉनने म्हटले आहे.