१८ जून २०१७ ही तारीख कोणताही भारतीय क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारुन भारताचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानसमोर अक्षरशः नांगी टाकली होती. याचदरम्यान कर्णधार विराट कोहली आणि तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या पार्श्वभुमीवर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघावर टिकेची झोड उठवली होती.

कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. महत्वाची गोष्ट म्हणजे, साखळी फेरीत पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे मात करुन धडाक्यात सुरुवात केली होती. सर्व संघांचं आव्हान परतवून लावणाऱ्या भारताला साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला होता. यानंतर भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार हे समजल्यानंतर सर्व चाहत्यांमध्ये एक स्फुर्तीचं वातावरण पसरलं होतं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात भारतीय संघाने केलेली कामगिरी ही अतिशय निराशाजनक होती.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराटच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली होती. मात्र विराटचा हा निर्णय त्याच्यावरच उलटला. अझर अली आणि फखर झमान यांनी १२८ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. यानंतर मोहम्मद हाफीज, बाबर आझम या फलंदाजांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३३८ धावांचा टप्पाही गाठला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खडतर झाली. साखळी सामन्यात धावांचा रतीब घालणारे भारताचे फलंदाज अंतिम सामन्यात ढेपाळले. १५ षटकांमध्येच भारताचा निम्मा संघ माघारी परतला. रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या मातब्बर फलंदाजांनीही या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र हार्दिक पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने भागीदारी रचून संघाचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी करुन हार्दिकने काहीकाळ पाकिस्तानी गोलंदाजांना चिंतेत पाडलं होतं. मात्र रविंद्र जाडेजासोबत चोरटी धाव काढताना पांड्या धावबाद होऊन माघारी परतला व भारताच्या उरल्यासुरल्या आशांवरही पाणी पडलं. यानंतर अवघ्या ३०.३ षटकांमध्ये भारताचा डाव १५८ धावांमध्ये संपुष्टात आला होता.

गतविजेत्या भारतीय संघासाठी व त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. यानंतर साहजिकपणे भारतीय संघाला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंवर भरघोष बक्षिसांचा पाऊस पाडला होता. मात्र पुढची अनेक वर्ष हा जिव्हारी लागणारा पराभव भारतीय चाहते कधीच विसरु शकणार नाहीत, एवढं मात्र नक्की!!