बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे प्रतिपादन

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील रौप्यपदकाने माझ्यावरील अपेक्षांमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे मला आता अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे, असे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सांगितले.

‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ (ओजीक्यू) या संस्थेतर्फे सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, ‘‘ऑलिम्पिक पदक मिळाल्यापासून जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाच्या नजरा आता माझ्यावर खिळल्या आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. परंतु मला मेहनत वाढवायला हवी, याची जाणीव झाली आहे.’’

‘‘माझ्या कामगिरीमुळे मी अतिशय आनंदित आहे. विश्व अजिंक्यपद स्पध्रेत पहिले कांस्यपदक जिंकले, तेव्हापासूनच क्रीडारसिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. चार वर्षांतून एकदा येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिकमध्ये या अपेक्षा आणखी वाढल्या. अजून बराच पल्ला गाठायचा आहे,’’ असे २१ वर्षीय सिंधूने सांगितले.

स्पेनच्या कॅरोलिन मारिनविरुद्ध तीन गेममध्ये लढतीत पराभूत झाल्यामुळे सिंधूला गेल्या महिन्यात ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. ‘ओजीक्यू’ ही संस्था तिला १५व्या वर्षीपासून पाठबळ देत आहे.