मोहम्मद आमिर व मोहम्मद अब्बासने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानने लॉर्ड्स कसोटीत यजमान इंग्लंडवर ९ गडी राखून मात केली आहे. या विजयासह पाकिस्तानने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेलं ६४ धावांचं आव्हान पाकिस्तानच्या इमान-उल-हक आणि हारिस सोहेल पूर्ण करुन पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संपूर्ण कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पहिल्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बास आणि हसन अलीने प्रभावी मारा करत इंग्लंडने प्रत्येकी ४-४ फलंदाज माघारी धाडले. पहिल्या डावात इंग्लंडकडून सलामीवीर अॅलिस्टर कुक आणि मधल्या फळीत जॉनी बेअरस्ट्रो-बेन स्टोक्स जोडीचा अपवाद वगळता एकही फलंदाज तग धरु शकला नाही. कुकने पहिल्या डावात ७० धावांची अर्धशतकी खेळी केली.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लिश आक्रमणाचा नेटाने सामना केला. सलामीवीर अझर अलीचं अर्धशतक व मधल्या फळीत असद शफीक आणि बाबर आझमने दिलेली झुंज या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ३६३ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज चांगला खेळ करतील अशी सर्वांना आशा होती, मात्र पाकिस्तानच्या आक्रमणासमोर इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा कोलमडला.

दुसऱ्या डावात सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार जो रुटने एका बाजूने किल्ला लढवत अर्धशतक साजरं केलं. यानंतर अखेरच्या फळीत जोस बटलर आणि डॉमनिक बेसने अर्धशतकी खेळी करुन पाकिस्तानला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. अखेर इंग्लंडने दिलेलं ६३ धावांचं आव्हान पाकिस्तानने अवघा १ गडी गमावत पूर्ण केलं.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव सर्वबाद १८४, अॅलिस्टर कुक ७०. मोहम्मद अब्बास ४/२३. पाकिस्तान पहिला डाव सर्वबाद ३६३, बाबर आझम ६८ (दुखापतीमुळे निवृत्त), असद शफीक ५९. बेन स्टोक्स ३/७३.

इंग्लंड दुसरा डाव सर्वबाद २४२ – जो रुट ६८, जोस बटलर – ६७. मोहम्मद आमिर ४/३६. पाकिस्तान ६६/१ हारिस सोहील ३९. अँडरसन १/१२

सामन्याचा निकाल – पाकिस्तान ९ गडी राखून विजयी, सामनावीर – मोहम्मद अब्बास