इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघ आपल्या खेळाडूंचा कसून सराव करून घेत आहेत. प्रत्येक संघाला आधी जाहीर केलेल्या संघात कोणतीही परवानगी न घेता २३ मे पर्यंत बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संघाने आपल्या प्राथमिक संघात महत्वाचे बदल केले असून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ यांना संधी दिली आहे. यासह असिफ अली यालाही संघात स्थान देण्यात आले असून जुनेद खान, फहीम अश्रफ आणि अबिद अली यांना संघाबाहेर करण्यात आले आहे.

पाकिस्तनाच्या प्राथमिक संघाची घोषणा आधी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळला. या मालिकेत पाकिस्तानने अत्यंत खराब कामगिरी केली. त्याच्या गोलंदाजांना सरासरी ३०० हून अधिक धावा चोपण्यात आल्या. त्यामुळे मालिका गमावल्यानंतर पाकिस्तनाच्या संघाने २० मे रोजी संघात ३ महत्वाचे बदल करत त्यात २ अनुभवी वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन घडवून आणले आहे.

मोहम्मद आमिर आणि असिफ अली हे दोघे इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या संघात होते. मोहम्मद आमिर एक सामना खेळला पण त्यानंतर तो कांजिण्यांमुळे मालिकेतून बाहेर झाला. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. असिफने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने ४ डावात २ अर्धशतके झळकावली आणि आपली जागा पक्की केली.

या संघात धक्कादायक निर्णय ठरला तो वहाब रियाझचा समावेश. २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यानंतर वहाब एकही सामना खेळला नाही. तसेच त्याने ऑक्टोबर २०१८ नंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तरीदेखील पाकिस्तान क्रिकेट मंडळाने विश्वास ठेवून वहाबला संधी दिली आहे.