पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाह याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या फिरकीची जादू दाखवत भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या पराक्रमाशी बरोबरी केली. १९९९ साली अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध एकाच दिवशी एका डावात १० गडी बाद करून विक्रमी कामगिरी केली होती. या कामगिरीशी मिळतीजुळती कामगिरी यासीरने केली.

न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होता. या एका दिवसाच्या खेळात यासिरने एकाच दिवसात १० गडी बाद केले. मात्र कुंबळेने एकाच डावात १० बळी टिपले होते. यासिरने एका डावात ८ बळी टिपले आणि दुसऱ्या डावात २ बळी टिपले.

पहिल्या डावात यासिरने ४१ धावा देत ८ बळी टिपले. यासीरने टिपलेल्या बळींपैकी ३ त्रिफळाचीत झाले, ३ पायचीत झाले तर दोघांना त्याने झेलबाद केले. ४१९ धावांचे आव्हान असलेल्या न्यूझीलंडचा संघ ९० धावांवर तंबूत परतला. त्यामुळे त्यांना फॉलो-ऑन देण्यात आला. या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडच्या संघाने दोन गडी गमावले. हे दोन गडीदेखील यासिरच्या गोलंदाजीवरच माघारी परतले.

दरम्यान, पाकिस्तानने पहिला डाव ५ बाद ४१८ धावांवर घोषित केला होता. या डावात हॅरीस सोहेल आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. हॅरीसने १४७ तर बाबरने नाबाद १२७ धावांची खेळी केली.