दीपक जोशी

सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील सहावा सामना दिवस-रात्र सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हे संघ तब्बल ११व्यांदा एकमेकांशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने १० पैकी सात सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकात सर्वोत्तम ३४८, तर न्यूझीलंडने सर्वाधिक २८६ धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाची नीचांकी धावसंख्या १५१, तर न्यूझीलंडची १३३ इतकी आहे. शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ विश्वचषकात पहिल्यांदाच लढणार आहेत. यापूर्वी तीन लढतींमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेकांशी लढले होते. त्यात आशिया चषकातील (२०१४ आणि २०१८) दोन लढतींचा समावेश होता. पाकिस्तानने तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे ते विजयी चौकार लगावणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.