पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि तडाखेबंद फलंदाज शाहिद आफ्रिदी हा गेले काही दिवस काश्मीर मुद्द्यावर भाष्य करत असल्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या काही विधानांमुळे त्याला टीकेचे धनीही व्हावे लागले आहे. पण आता मात्र तो क्रिकेटच्या विषयावरून चर्चेत आला आहे. आफ्रिदीने सध्या क्रिकेट खेळत असलेले चार सर्वोत्तम फलंदाज कोण? याचे उत्तर दिले आहे. त्यात त्याने भारताच्या केवळ एकाच खेळाडूला पसंती दिली आहे.

ट्विटरवर शाहिद आफ्रिदीने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यात एका चाहत्याने त्याला प्रश्न केला की सध्या क्रिकेट खेळत असलेल्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर आफ्रिदीकडून कोणत्या एका फलंदाजाचे नाव उत्तर म्हणून येते त्याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण आफ्रिदीने मात्र थेट ४ फलंदाजांची नावे सांगून टाकली. त्यात भारताच्या केवळ विराट कोहलीलाच त्याने पसंती दर्शविली. कोहलीसोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रुट आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्या नावाला पसंती दर्शवली.

पण त्यानंतर त्याला कोहली आणि बाबर आझम यांच्यात सर्वोत्तम कोण? असाही एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न त्याने शिताफीने हाताळला आणि दोन्ही फलंदाज उत्तम आहेत, असे उत्तर दिले. सध्या टी २० क्रिकेटमध्ये भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम या दोनच खेळाडूंची धावांची सरासरी ५० पेक्षा आहे. पण त्यातही विराटने ७१ सामन्यांमध्ये ही सरासरी टिकवून ठेवली आहे, तर बाबर आझमने ३० सामन्यात हा पराक्रम केला आहे. त्यामुळे बाबर आझम हीच कामगिरी कायम ठेवतो का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.