हॉकी इंडिया लिगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असल्याच्या निषेधार्थ रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एमएचए स्टेडियमवर जोरदार निदर्शने केली. या पाश्र्वभूमीवर २८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक स्पध्रेतही पाकिस्तानी संघाचा समावेश असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही (बीसीसीआय) सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी महिला संघाचे सर्वच सामने बीसीसीआय मुंबईतून अहमदाबादला हलविण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बठकीमध्ये अध्यक्ष एन. श्रीनिवासन याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी संघाचे साखळी फेरीतील सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमला खेळविण्यात यावे, असा प्रस्ताव आयसीसी महिला विश्वचषकाचे स्पर्धा संचालक सुरू नायक मंगळवारी सादर करणार असल्याचे समजते.
‘‘बीसीसीआयला याबाबत पूर्ण माहिती आहे. ते रवी सवानी आणि मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. अहमदाबाद हा सर्वात नजीकचा पर्याय असेल. २०११मध्ये पुरुषांच्या विश्वचषक स्पध्रेचेही काही सामने तिथे झाले होते. परंतु या संदर्भातील अंतिम निर्णय श्रीनिवासन घेतील,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानी महिला संघ २६ जानेवारीला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. २८ जानेवारीला वानखेडे स्टेडियमवर ते इंग्लंडशी सलामीचा सामना खेळणार आहेत. यानंतर ते पुढील तीन सामने वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमसीए मैदानावर खेळणार आहेत. संयोजकांनी स्पध्रेच्या वेळापत्रकात किरकोळ बदल केल्यास आमची कोणतीही हरकत नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
..तर वानखेडेवरील महिला विश्वचषकाचे तीन सामनेही अन्यत्र हलवावे लागणार!
पालम येथे होणाऱ्या रणजी उपांत्य सामन्यात मुंबईने सेनादलाला हरविल्यास अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात यावा, अशी विनंती एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी पत्राद्वारे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना केली आहे. ही विनंती आयसीसीने जर मान्य केली तर या कालावधीतील तीन सामने अन्यत्र हलवावे लागणार आहेत.