ऑलिम्पिक क्रीडादिन मंगळवारी साजरा केला जात असून, त्याचे औचित्य साधून फ्रान्सतर्फे २०२४च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनपदाच्या प्रस्तावाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. त्यांच्याबरोबरच बुडापेस्ट (हंगेरी) हे शहरही या शर्यतीत उतरणार असल्याचे समजते.
या स्पर्धेच्या संयोजनपदाकरिता बोस्टन (अमेरिका), रोम (इटली) व हॅम्बुर्ग (जर्मनी) यांनी यापूर्वीच संयोजनपदाकरिता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मते मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याखेरीज बाकू (अझरबैजान) या शहराकडूनही या स्पर्धेच्या संयोजनपदाकरिता चाचपणी केली जात आहे. पाचव्या युरोपियन स्पर्धा या शहरात होणार आहेत. ही स्पर्धा ऑलिम्पिक संयोजनपदाचे व्यासपीठ म्हणून अझरबैजानचे संघटक प्रयत्न करीत आहेत. कतारही या शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे.
संयोजनपदाचा निर्णय १५ सप्टेंबर २०१७ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या परिषदेत घेतला जाणार आहे. पॅरिस व बोस्टन यांच्यात संयोजनपदाकरिता चुरस राहील अशी अपेक्षा आहे. १९९६ नंतर अमेरिकेने वासंतिक ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. पॅरिस येथे यापूर्वी १९२४ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर २००८ व २०१२च्या ऑलिम्पिकसाठी पॅरिसने प्रस्ताव दिले होते, मात्र दोन्ही वेळा त्यांना या संधीपासून वंचित राहावे लागले होते. साहजिकच फ्रान्सच्या ऑलिम्पिक संघटकांनी २०२४ चे संयोजनपद मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जर मंगळवारी संयोजनपद जाहीर करण्यात आले नाहीतर १४ जुलै रोजी राष्ट्रीय संचलनदिनाच्या वेळी ते याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. १९९८ मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आयोजित करण्यात आलेल्या मुख्य स्टेडियमसह काही प्रमुख स्टेडियम्सवर ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची योजना या प्रस्तावात असणार आहे. तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये कनोईंग स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकणारे माजी ऑलिम्पिकपटू टोनी इस्तांग्वेट हे या प्रस्तावाचे प्रमुख असतील.
जर्मन ऑलिम्पिक क्रीडा महासंघाचे अध्यक्ष अल्फोन्स होर्मन यांनी सांगितले, ज्या शहरास लोकांचा जास्त पाठिंबा मिळेल त्या शहरास हा मान मिळावा असे आमचे मत आहे. अर्थात शेवटी ऑलिम्पिक समितीच्या परिषदेत जो निर्णय होईल तो सर्वाना मान्य करावा लागेल.
पॅरिसच्या महापौर अ‍ॅनी हिडाल्गो म्हणाल्या, २०१६ मध्ये या पदासाठी रीतसर प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्याकरिता लोकाभिमुख पाठिंबा मिळणे महत्त्वाचे आहे.
बोस्टन व हॅम्बुर्ग या दोन्ही शहरांमधील लोकांकडून या प्रस्तावास विरोध होण्याची शक्यता आहे, मात्र दोन्ही शहरांमधील ऑलिम्पिक संघटक आशावादी आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संघटकांनी रोम शहराबाबत अनुकूलता दाखवली असली तरी तेथील राजकीय नेत्यांनी या प्रस्तावावरून टीका सुरू केली आहे.