इंग्लंडविरुद्धच्या आगामी तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त वृद्धीमान साहा याच्याऐवजी पार्थिव पटेल याची वर्णी लागली आहे. विशाखापट्टणम येथील कसोटी सामन्यात वृद्धीमान साहाच्या डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने त्याला दुखापत झाली होती. भविष्यात या दुखापतीने गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून वृद्धीमान साहाला आगामी सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहाच्या या दुखापतीमुळे पार्थिव पटेलला मात्र अनपेक्षितपणे भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. यानिमित्ताने पार्थिव पटेल तब्बल आठ वर्षानंतर कसोटी सामना खेळणार असून तब्बल चार वर्षानंतर पार्थिव पटेल पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणार आहे. यापूर्वी पार्थिव पटेल २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर २०१२ मध्ये पार्थिवने भारतीय संघाकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पार्थिव पटेल याने आतापर्यंतच्या कारकीर्दीत २० कसोटी सामने खेळले असून त्याने २९.६९ च्या सरासरीने ६८३ धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात वृद्धीमान साहाचा समावेश होता. सलामीवीर गौतम गंभीरला टीम इंडियातून वगळण्यात आले असून भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुस-या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवून मालिकेत १- ० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. आता पहिली कसोटी पार पडल्यावर मंगळवारी निवड समितीने उर्वरित तीन सामन्यांसाठी संघाची निवड केली. दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौ-याला मुकला आहे. तर पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेल्या गौतम गंभीरला उर्वरित तीन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळल्यावरच त्याचा संघात समावेश करण्याबाबत विचार केला जाईल असा निर्णय प्रशिक्षक अनिल कुंबळेने घेतला होता. भुवनेश्वरकुमार रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळला होता. रणजीत भुवनेश्वरने ३६ षटकं टाकली. या दरम्यान त्याने दोन विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.