मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य सरकारचा इशारा

थकीत देणी, कराराचे नूतनीकरण तसेच बांधकामामध्ये अनधिकृतपणे बदल केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि राज्य सरकार यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहेत. त्यामुळेच थकीत देणी आणि कराराच्या नूतनीकरणाचे १२० कोटी रुपये भरा अन्यथा वानखेडे स्टेडियम आमच्याकडे सुपूर्द करा, अशा आशयाची नोटीस मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी ‘एमसीए’ला पाठवली आहे.

‘एमसीए’च्या स्वत:च्या मालकीचे स्टेडियम असावे, या हेतूने एस. के. वानखेडे यांनी १९७५मध्ये वानखेडे स्टेडियमची उभारणी केली. वानखेडे स्टेडियमची आसनक्षमता ३३ हजार इतकी असून राज्य सरकारने त्यांना ही जागा ५० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली होती. हा करार गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आला होता. या करारानुसार, ‘एमसीए’ बांधकाम केलेल्या जागेपैकी प्रति स्क्वेअरसाठी १ रुपया, तर उर्वरित जागेसाठी १० पैसे या दराने भाडे देत होती. मात्र याच वास्तूत ‘क्रिकेट सेंटर’ हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्यालय बांधण्यात आले. या क्रिकेट सेंटरच्या बांधकामासाठी भाडय़ाचे दर बदलले असून एमसीएने केलेल्या प्रत्येक बांधकामासाठी परवानगी घेतलेली नाही, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिल रोजी पाठवलेल्या नोटिशीत केला आहे.

‘‘कराराच्या नूतनीकरणासाठी एमसीएने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली असली तरी आम्ही बाजारमूल्यानुसार भाडे भरण्यात यावे, अशी मागणी केली आहे. बीसीसीआयचे मुख्यालय बांधण्यासाठी सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या की नाही, हे आम्ही तपासून पाहत आहोत,’’ असे जोंधळे यांनी सांगितले.

एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. नाईक यांना मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नोटिशीचा पत्ताच नाही. दरम्यान, वानखेडे स्टेडियमचे वास्तुरचनाकार शशी प्रभू यांनी या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यासाठी कोणताही वाव नाही, असे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘२०११ विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्टेडियमचे नूतनीकरण करण्याआधी सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. बीसीसीआयचे मुख्यालय हे क्रिकेटशी निगडित आहे.’’

आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते वाय. पी. सिंग यांनी ‘एमसीए’तील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘‘इन्डोअर क्रिकेट अकादमी म्हणून बीसीसीआयचे मुख्यालय दाखवण्यात आले आहे. वाहने पार्किंग करण्यासाठी जागेची कमतरता असून अग्निशमन दलाच्या गाडय़ा फिरण्यासाठीही जागा नाही,’’ असे सिंग यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच वानखेडे स्टेडियमची पाहणी केली जाईल, असे मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर म्हणाले. तसेच कराराचे नूतनीकरण करण्यासाठी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना ३ मे रोजी समन्स पाठवले जाईल, असेही डावखर यांनी सांगितले.