पंजाब किंग्जसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार केएल राहुलला अपेंडिक्समुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पंजाब किंग्जने ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर राहुलला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे या आजाराचे निदान झाले.

 

”काल रात्री राहुलला पोटात तीव्र वेदना झाल्या. औषधाचा कोणताही परिणाम न झाल्यामुळे त्याला आपत्कालीन कक्षात तपासणीसाठी नेण्यात आले. तेव्हा त्याला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेद्वारे तो बरा होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे”, असे पंजाबने ट्विटरद्वारे सांगितले.

पंजाबसाठी मोठा धक्का

केएल राहुलवर शस्त्रक्रिया झाल्यास त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल आणि अशा परिस्थितीत तो आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पंजाब संघाला मोठा धक्का बसणार आहे. राहुल सध्या लीगमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. त्याने ७ सामन्यांत ३३१ केल्या असून त्याच्याकडे ऑरेंज कॅपचा मानही आहे.

पंजाब किंग्जने या मोसमात आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत आणि ३ विजय मिळवले आहेत. पंजाबच्या खात्यात ६ गुण असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. राहुलची शस्त्रक्रिया कधी होईल, याबाबत संघाने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, तो आयपीएलबाहेर पडल्यास संघाला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.