स्पॉट फिक्सिंगच्या गर्तेत अडकलेल्या इंडियन प्रिमिअर लीगमधून आता हळूहळू प्रायोजकही बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएलचे ‘टायटल स्पॉन्सर’ असलेल्या पेप्सिको कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नोटीस पाठवली असून, आयपीएलमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे आयपीएलची बदनामी झाली असून, यापुढे या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून राहण्याची आपली इच्छा नाही, असे कंपनीने नोटिसीमध्ये स्पष्ट केले आहे.
आयपीएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुंदर रमण यांना पेप्सिकोने नोटीस पाठवली आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीसाठी आयपीएलचे प्रायोजक म्हणून पेप्सिकोने ३९६ कोटी रुपये दिले आहेत. या नोटिसीनंतर सुंदर रमण यांनी मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांना याबद्दल माहिती दिली असल्याचे समजते. बीसीसीआय आणि आयपीएल या दोन्ही ठिकाणच्या सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला याबद्दल माहिती दिली. दरम्यान, यासंदर्भात कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आयपीएलच्या प्रायोजकत्वातून बाहेर पडण्याची आपली इच्छा असल्याचे संकेत पेप्सिकोने यापूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या नोटिसीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आयपीएलच्या गेल्या पर्वावेळीच पेप्सिकोने प्रायोजकत्व काढून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मनधरणी केल्यानंतर कंपनीने आपला निर्णय बदलला होता, असे सूत्रांनी सांगितले.