News Flash

फेडरर अजूनही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावू शकतो -सॅम्प्रस

आपल्या शैलीदार खेळाने १७ ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई करणाऱ्या रॉजर फेडररचा प्रभाव आता ओसरू लागला आहे. गेल्यावर्षी त्याला एकही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही.

| February 21, 2014 12:14 pm

आपल्या शैलीदार खेळाने १७ ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई करणाऱ्या रॉजर फेडररचा प्रभाव आता ओसरू लागला आहे. गेल्यावर्षी त्याला एकही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. क्रमवारीतही ‘अव्वल पाच’मधून त्याची घसरण झाली आहे, नवखे खेळाडू त्याला पराभूत करण्याची किमया साधत आहेत. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही फेडरर अजून चार वर्षे व्यावसायिक टेनिस खेळू शकतो आणि निश्चितपणे ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा करू शकतो, असा विश्वास माजी टेनिसपटू पीट सॅम्प्रसने व्यक्त केला. आंद्रे आगासीविरुद्धच्या प्रदर्शनीय सामन्याच्या पाश्र्वभूमीवर सॅम्प्रस बोलत होता.   
‘‘‘इतकी वर्षे स्पर्धात्मक टेनिस खेळण्याची फेडररची क्षमता प्रभावित करणारी आहे. टेनिसमधील सर्व महत्त्वाच्या स्पर्धाची जेतेपदे त्याने नावावर केली आहेत. कोणत्याही क्षणी तो टेनिसला समाधानाने अलविदा करू शकतो. मात्र अजूनही त्याला खेळायचे आहे. जगभर होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याची ही महत्त्वाकांक्षा अचंबित करणारी आहे. टेनिसचा तो सच्चा प्रेमी आहे,’’ असे सॅम्प्रसने सांगितले.
विजयपथावर परतण्यासाठी फेडररने माजी ज्येष्ठ खेळाडू स्टीफन एडबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा निर्णय घेतला. वर्षांतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. जो विल्फ्रेड त्सोंगा आणि अँडी मरे यांसारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान संपुष्टात आणत फेडररने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र राफेल नदालविरुद्धच्या पराभवामुळे जेतेपदाने पुन्हा एकदा त्याला हुलकावणी दिली. मात्र फेडररच्या या पराभवाचे सॅम्प्रसला आश्चर्य वाटत नाही. ‘‘नदालविरुद्ध खेळताना शंभर टक्के सर्वोत्तम खेळ होऊ शकला नाही तर सामना झटकन हातातून निसटतो. नदाल अविचल असतो. मात्र नदालविरुद्धच्या सामन्यातून अनेक गोष्टी शिकत फेडरर यंदा दमदार कामगिरी करेल,’’ असा विश्वास सॅम्प्रसने व्यक्त केला.
‘‘ग्रँडस्लॅम जेतेपद त्याला खुणावते आहे आणि म्हणून अजूनही तो खेळत आहे. त्याच्या लाडक्या विम्बल्डनच्या हिरवळीवर त्याचे ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते,’’ असा आशावाद सॅम्प्रसने व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 12:14 pm

Web Title: pete sampras roger federer can win more grand slams
टॅग : Roger Federer,Tennis
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : क्रूस क्षेपणास्त्रापुढे अर्सेनेल भुईसपाट!
2 सिंधूची क्रमवारीत आगेकूच
3 एमसीसीचे नेतृत्व सेहवागकडे
Just Now!
X