विम्बल्डन टेनिस स्पर्धा या घरच्या स्पर्धेत इंग्लिश खेळाडूंना गेली ७७ वर्षे विजेतेपद मिळविता आले नव्हते. मात्र अँडी मरे याने यंदा ही अपयशाची मालिका खंडित केली. त्याच्या या यशास भारताच्या पिंकी सोनकर हिचा वाटा होता असे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही. मात्र पिंकी हिने केलेली नाणेफेक मरे याच्यासाठी लाभदायक ठरली.
पिंकी ही वाराणसीजवळील मिर्झापूर येथे राहते. अतिशय गरीब कुटुंबातील या मुलीच्या ओठावर महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, मात्र तिच्या पालकांना हा खर्च परवडणारा नव्हता. प्लॅस्टिक सर्जन सुबोधकुमार सिंह यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी एकही पैसा न घेता तिच्या ओठावर शस्त्रक्रिया केली. तिच्यावर मेगान मिलान यांनी ३९ मिनिटांचा लघुपट तयार केला होता. हा चित्रपट पाहून विम्बल्डन संयोजकांनी पिंकी हिला पुरुषांच्या अंतिम लढतीचे वेळी नाणेफेक करण्याची संधी दिली. मरे याने नाणेफेक जिंकली. ही नाणेफेक मरे याच्यासाठी नशीबवान ठरली.
पिंकी हिला ब्रिटिश उच्चायुक्त सर जेम्स बेव्हन यांनी पिंकी हिचा सत्कार करताना, पिंकी ही मरे याच्याकरिता तसेच आमच्यासाठी लाभदायक ठरेल असे भाकीत केले होते आणि त्यांचा अंदाज खरा ठरला.
मरे याने विजेतेपद मिळविल्यानंतर बेव्हन यांनी सांगितले, की पिंकीमुळे पुन्हा विम्बल्डनवर इंग्लिश खेळाडूंकरिता आनंद दिसून येऊ लागला आहे. गेल्या ७७ वर्षांमध्ये आमच्या खेळाडूंना येथे विजेतेपद मिळविता आले नव्हते.मात्र यंदा पिंकी हिने केलेली नाणेफेक आमच्यासाठी कलाटणी देणारी ठरली आहे. तिचे हास्य आमच्या खेळाडूंसाठी येथून पुढेही प्रेरणादायक व नशिबाची साथ देणारे ठरेल.