भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होते आहे. अँटीग्वाच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. अंतिम संघात कोणाला स्थान मिळणार याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कसोटी संघात सलामीच्या जोडीसाठी एक पर्याय सुचवला आहे. वन-डे क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही रोहित शर्माला सलामीला खेळायला द्या, असा सल्ला सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला दिला आहे.

मुरली विजय, शिखर धवन या पारंपरिक कसोटी सलामीवीरांना यंदा भारतीय संघात जागा मिळालेली नाहीये. युवा खेळाडू पृथ्वी शॉ सध्या डोपिंगच्या कारवाईमुळे खेळू शकणार नाहीये. अशा परिस्थितीत मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल ही भारताची सलामीची जोडी मैदानात उतरु शकते. लोकेश राहुलला कसोटी क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव असला तरीही मयांक अग्रवाल आतापर्यंत दोनच कसोटी सामने खेळला आहे. याचसोबत मधल्या फळीत कोणता फलंदाज आपलं स्थान कायम राखेल याबद्दल अजुनही उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत सौरव गांगुलीने रोहितला सलामीला संधी देण्याचा सल्ला दिला आहे. “माझ्या मते रोहितला त्याने विश्वचषकात पकडलेली चांगली लय कायम राखण्याची संधी दिली पाहिजे. त्याला सलामीच्या जागेवर संधी देऊन, अजिंक्य रहाणेवर मधल्या फळीची जबाबदारी द्यायला हरकत नाही.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या आपल्या कॉलममध्ये गांगुलीने हे मत मांडलं आहे.

वन-डे आणि टी-२० संघात रोहितने आपलं स्थान पक्क केलं असलं तरीही कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी चमक दाखवता आलेली नाही. २०१८ साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित चार डावांमध्ये केवळ ७८ धावा करु शकला होता. यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आलं. वर्षाअखेरीस रोहित ऑस्ट्रेलियातही कसोटी सामने खेळला, मात्र तिकडेही तो आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संघात संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.