भ्रष्टाचाराचे आरोप झालेले फिफाचे माजी उपाध्यक्ष मायकल प्लॅटिनी यांनी शिस्तपालन समितीवर बहिष्कार टाकला, पण प्लॅटिनीच्या सुनावणीसाठी त्यांचे वकील मात्र उपस्थित होते. फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी मात्र या सुनावणीला उपस्थित राहून गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले.

ब्लाटर यांची शिस्तपालन समितीकडून आठ तास कसून चौकशी झाली. त्यांच्यावर या वेळी शिस्तपालन समितीने प्रश्नांच्या फैरी झाडल्या, मात्र त्यांनी यापैकी एकाही आरोपाचे पुरावे नाहीत, अशी आपली बाजू मांडली.

भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यावर ब्लाटर आणि प्लॅटिनी यांच्यावर ९० दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या शिस्तपालन समितीने त्यांना दोषी ठरवल्यास त्यांच्यावर आजीवन बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिस्तपालन समितीने यापूर्वीच आपला निर्णय तयार केला आहे, त्यामुळे या चौकशीला जाण्यात काही अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी बहिष्काराचा पवित्रा घेतला. ब्लाटर हे शिस्तपालन समितीची सुनावणी ऐकून घेण्यापूर्वीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे ब्लाटर यांनी ठणकावून सांगितले असून या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होण्याची त्यांना आशा आहे.