क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची बहीण आणि त्यांच्या पत्नीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्याच्या वादाने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जडेजाची बहीण नयनबा आणि पत्नी रिवाबा यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाले आहे. मास्क न घालण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा भारतीय जनता पक्षात (भाजप) आहे. रिवाबा करणी क्षत्रिय सैन्याच्या सौराष्ट्र युनिटची अध्यक्षही आहे. रिवाबा सामाजिक कार्यात सक्रिय असते. दुसरीकडे बहीण नयनाबा काँग्रेसमध्ये आहे. रिवाबाला जडेजाची साथ मिळाली, तर नयनाबाला बहीण आणि वडिलांचा पाठिंबा मिळाला. यामुळे घरात राजकीय वाद कायम आहे.

एका वृत्तानुसार, रिवाबा आणि नयनाबा यांच्यातील वाद एका राजकीय कार्यक्रमानंतर सुरू झाला. रिवाबाच्या एका कार्यक्रमात लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. या कार्यक्रमात तिने योग्यरित्या मास्क घातला नव्हता. यावर भाष्य करताना नयनाबाने टीका केली. गुजरातमधील तिसऱ्या लाटेसाठी असे लोक जबाबदार असतील, असे नयनाबाने म्हटले.

हेही वाचा – ३ टेस्ट, ३ वनडे आणि ४ टी-२० सामने..! विराटसेना करणार ‘या’ देशाचा दौरा

याआधी गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये रिवाबा मास्क न घातल्यामुळे वादात सापडली होती. गाडीतून उतरताना तिने मास्क घातला नव्हता. यानंतर पोलिसांनी तिची गाडी थांबवली, ज्यावर खूप वादही झाला. जडेजा सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघात करोनाने प्रवेश केल्यामुळे इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. या मालिकेनंतर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून जडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.