पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांची प्रेरणादायी यशोगाथा

संकेत गोलतकर, मुंबई</strong>

वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी पॉवरलिफ्टिंगमध्येही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुटुंबातील दैनंदिन कार्ये, रुग्णांची देखभाल अशा रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून त्यांनी सलग तिसऱ्यांदा ‘बलवान महिला’ (स्ट्राँग वुमन) हा किताब जिंकून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

कल्याण येथील गोवली महाविद्यालयाच्या क्रीडांगणात झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवण्याबरोबरच त्यांनी सर्व विजेत्यांच्या स्पर्धेतही यश संपादन करून हा बहुमान मिळवला. यापूर्वी २०१७ व २०१८ मध्ये त्यांनी ५२ किलो गटात हा पराक्रम केला होता.

या स्पर्धेसाठी केलेल्या तयारीबाबत शर्वरी म्हणाल्या, ‘‘वैद्यकीय कामातून दररोज किमान दोन तास वेळ काढून मी पॉवरलिफ्टिंगचा सराव करायची. त्याशिवाय घरातीन अन्न खाण्यावर भर देऊन बाहेरचे विशेषत: तळलेले पदार्थ खाण्याचे मी टाळले. शरीराची तंदुरुस्ती राखण्यासाठी सूर्यनमस्कार, पुशअप्स, डबल बार यांसारखे विविध व्यायाम प्रकार केले. त्यामुळेच माझी देहयष्टी कणखर बनली आणि मी यश मिळवू शकले.’’

‘‘पुढील वर्षी राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रंगणार आहे. त्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा असून त्यासाठी मी आतापासूनच तयारीला लागली आहे. राष्ट्रीय पातळीवर पहिले पदक मिळवण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे शर्वरी यांनी सांगितले.

वयाची तिशी ओलांडल्यानंतरही पॉवरलिफ्टिंगकडे वळणाऱ्या शर्वरी आपल्या कारकीर्दीविषयी म्हणाल्या, ‘‘बालपणापासूनच मला अवजड वस्तू उचलण्याची कला अवगत होती. त्याशिवाय मला पॉवरलिफ्टिंग हा खेळही फार आवडायचा. मात्र वयाच्या २०व्या वर्षी विवाह झाल्यामुळे मला त्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्याशिवाय मी डॉक्टर असल्यामुळे स्वत:ची तंदुरुस्ती कशी राखायची, हे मला योग्य प्रकारे जमते. अखेरीस वयाच्या ३४व्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये माझ्या स्पर्धात्मक कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यामुळे आता माझ्या कारकीर्दीने खऱ्या अर्थाने वेग पकडला असून भविष्यात अधिकाधिक पदके जिंकण्याचे ध्येय मी उराशी बाळगले आहे.’’