अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा विकेटनं दारुण पराभव केला. दिवसरात्र कसोटी सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवत मालिकेत २-१ च्या फरकानं आघाडी घेतली आहे. यजमान संघाचा हा विजय कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा मायदेशातील हा २२ वा कसोटी विजय होता. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमाची नोंद विराट कोहलीच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या नावावर होता. धोनीनं मायदेशात २१ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.

चेन्नईतील दुसरा सामना जिंकून विराट कोहलीनं धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता या विजयासह मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराट आणि धोनीनंतर या यादीमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि सुनील गावसकर यांचा देखील समावेश आहे. मायदेशात अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारतानं १३, गांगुलीच्या 10 आणि गावसकर यांच्या नेतृत्वात सात विजय मिळवले आहेत.

याआधीच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील ५९ कसोटी सामन्यात भारतानं ३५ विजय मिळवले आहेत. तर १४ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. १० सामने अनिर्णीत राखण्यात विराटला यश आलं आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने ६० कसोटी सामन्यांपैकी भारतानं 27 सामने जिंकले आणि १८ गमावले. तर १५ सामने अनिर्णीत राहिले होते.

२०११ मध्ये विराट कोहलीने धोनीच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, २०१४ च्या उत्तरार्धात धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर विराटला कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आलं होतं. तेव्हापासून विराट कोहलीनं भारतीय संघाचं नेतृत्व यशस्वीपणे केलं आहे.