आपल्या जादुई खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. भारतीय हॉकीत ध्यानचंद यांनी दिलेलं योगदान लक्षात घेता २९ ऑगस्ट हा दिवस देशात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी वर्षभरात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याव्यतिरीक्त खेळाडूंची कारकिर्द घडवणाऱ्या प्रशिक्षकांचाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन करत, भारतीय हॉकीसाठी त्यांनी दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही असं म्हटलं आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनीही आज नवी दिल्लीतील ध्यानचंद स्टेडीयमवर उभ्या असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आजच्या दिवशी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आल्याची घोषणाही केली. या वर्षापासून अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे १५ आणि २५ लाखांचं मानधन दिलं जाणार असल्याचं रिजीजू यांनी जाहीर केलं

राष्ट्रपती भवनात आजच्या दिवशी सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येतो. मात्र यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आज राष्ट्रपती भवनात पार पडणारा कार्यक्रम हा व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला जाणार आहे.

अवश्य वाचा – National Sports Day : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याविषयी १० महत्वाच्या गोष्टी