मुंबई : पुण्यातील फग्र्युसन कॉलेजचा फिजिओथेरपीचा विद्यार्थी मेघ ठक्कर याने अमेरिकेतील केंटुकीत झालेल्या ‘आयर्नमॅन चॅलेंज  स्पर्धे’चे अत्यंत बिकट आव्हान पार करून दाखवले. विशेष म्हणजे मेघने त्याच्या वयाच्या १८व्या वर्षी हे आव्हान पार करताना भारतातील आणि बहुधा जगातील सर्वात कमी वयाचा आयर्नमॅन हा किताबदेखील पटकावला आहे.

‘आयर्नमॅन’ बनण्याच्या खडतर आव्हानासाठी किमान वयाची पात्रताच १८ वर्षांची असून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने हे लक्ष्य पार करीत अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. ‘फुल आयर्नमॅन’साठी १६ तासांमध्ये ३ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन धावण्याचे दिव्य पार करणे बंधनकारक असते. मेघने हे आव्हान १३ तास ५३ मिनिटांतच पूर्ण करीत त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली. मेघ जलतरणासाठी कल्पना आगाशे, तंदुरुस्तीसाठी विजय गायकवाड तर ट्रायथलॉनसाठी कौस्तुभ राडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.