विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदकाची कमाई आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत भारताच्या पी. व्ही. सिंधूने यंदाचे वर्ष चांगलेच गाजवले. पण आगामी वर्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण स्पर्धा असून पुढील ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी जोमाने तयारी करणार असल्याचे सिंधूने सांगितले.‘‘पुढील वर्षांमध्ये ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठीच्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. कामगिरी पाहता मला अजून बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पुढील वर्षी काही सुपर सीरिज आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिकीट निश्चित करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे सिंधू म्हणाली. मकाऊ स्पर्धेचे जेतेपद पटकावले असले तरी चुका सुधारण्यावर भर असल्याचे सिंधूने सांगितले. ती म्हणाली, ‘‘मकाऊ स्पर्धेत मी चीनच्या स्पर्धकांना पराभूत केले. त्या दिवशी जो चांगला खेळतो त्याचा विजय होत असतो. काही वेळेला चुकाही होतात. त्यामुळेच चुका कमी करण्यावर माझा भर असेल. बऱ्याच देशांतील खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आहे, त्यामुळे मला गाफील राहून चालणार नाही. आम्हाला लक्ष्यावर ध्येय केंद्रित करून अथक मेहनत घ्यावी लागणार आहे.’’ जागतिक क्रमवारीमध्ये सिंधू सध्या ११व्या स्थावावर असली तरी या गोष्टींना जास्त महत्त्व देत नसल्याचे ती सांगते.