22 September 2020

News Flash

सिंधूला जेतेपद!

दोन वेळा जागतिक कांस्यपदकावर मोहोर उमटवणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याची करामत केली.

| December 1, 2014 04:53 am

दोन वेळा जागतिक कांस्यपदकावर मोहोर उमटवणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याची करामत केली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कोरियाच्या किम ह्य़ो मिनला पराभवाचा धक्का देत सिंधूने या मोसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.
जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर घसरलेल्या सिंधूने ४५ मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीत ९१व्या क्रमांकाच्या किमला २१-१२, २१-१७ असे सहज पराभूत करून जेतेपद पटकावले. चीनच्या सातव्या मानांकित यू सन हिचा पराभव करत अंतिम फेरी गाठणाऱ्या किमचे कडवे आव्हान सिंधूला पेलावे लागणार, असे दिसत होते. पण ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूने तिला वरचढ होण्याची संधीच दिली नाही.
किमने आक्रमक सुरुवात करत पहिल्या गेममध्ये ३-० अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने तिचे आक्रमण हळूहळू परतवून लावत ६-६ अशी बरोबरी साधली. बॅकहँडचे फटके परतवताना किमला अडचणी येत होत्या. मात्र सिंधूने अप्रतिम स्मॅशेस लगावत १९-९ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यातच किमचे फटके नेटवर जात होते. क्रॉसकोर्टचे सुरेख फटके लगावत तिने सिंधूला झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण २०व्या मिनिटालाच सिंधूने पहिला गेम जिंकून जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.
किमच्या सुमार फटकेबाजीमुळे तिला गुण गमवावे लागले, मात्र क्रॉसकोर्टच्या फटक्यांद्वारे तिने ७-७ अशी बरोबरी मिळवण्यात यश मिळवले. बेसलाइनवर सिंधूचा खेळ चांगला होत नसताना किम ११-८ अशा आघाडीवर पोहोचली होती. त्यानंतर सिंधूने सलग पाच गुण मिळवत १३-११ अशी आघाडी घेतली. १३-१३ अशा बरोबरीनंतर किम १३-१७ अशी पिछाडीवर पडली. सिंधूचे फटके परतवण्यात किम अपयशी ठरली. अखेर किमचा फटका कोर्टबाहेर गेल्यामुळे सिंधूने दुसऱ्या गेमसह जेतेपदावर नाव कोरले.

या वर्षांतील पहिले जेतेपद आणि मोसमाची यशस्वी सांगता केल्याचा आनंद होत आहे. किमने सुरेख खेळ करून तगडय़ा प्रतिस्पध्र्यावर मात करून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध जिंकणे सोपे नाही, याची कल्पना होती. गुणफलकावर नजर टाकल्यास, माझा विजय सोपा वाटत असला तरी या सामन्यात किमच्या कडव्या संघर्षांचा सामना करावा लागला. हे वर्ष माझ्यासाठी चांगले गेले. अनेक बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवून मी आशियाई, जागतिक स्पर्धेत पदके मिळवली. आता कठोर मेहनत घेऊन मी पुढील वर्षांसाठी सज्ज होणार आहे.
– पी. व्ही. सिंधू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:53 am

Web Title: pv sindhu defends macau open grand prix gold badminton title
टॅग Badminton,Pv Sindhu
Next Stories
1 उंचावलेल्या मनोधैर्याचा लाभ होईल!
2 तिवारी की सवारी!
3 ह्य़ुजेसच्या निवासस्थानी अ‍ॅडलेडला आता पहिली कसोटी
Just Now!
X