सायना, श्रीकांत, समीरला पराभवाचा धक्का

सिंगापूर : संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत संघर्ष करावा लागला. सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेनंतर यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

जपानच्या द्वितीय मानांकित नोझोमी ओकुहाराने सहाव्या मानांकित सायनाला २१-८, २१-१३ असे अवघ्या ३६ मिनिटांत सहज पराभूत केले. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यानयानला पहिल्या गेममध्ये ५-५ अशा बरोबरीनंतर पिछाडीवर टाकत पहिला गेम २१-१३ असा जिंकला.दुसऱ्या गेममध्ये मात्र यानयानने सिंधूला मध्यंतराला ११-६ असे पिछाडीवर टाकले. अखेरीस सिंधूला हा गेम १७-२१ असा गमवावा लागला. तिसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने यानयानला अजिबात संधी न देता २१-१४ असा जिंकत सामना खिशात घातला.उपांत्य फेरीत सिंधू आणि ओकुहारात झुंज होणार आहे.

पुरुष एकेरीत भारताच्या श्रीकांतला अव्वल मानांकित केंटो मोमोटाशी संघर्षपूर्ण सामन्यानंतर पराभव पत्करावा लागला. मोमोटाविरुद्ध हा  त्याचा नववा पराभव ठरला. या सामन्यातील पहिला गेम मोमोटाने २१-१८ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवत तो गेम २१-१९ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये मात्र मोमोटाने श्रीकांतला अजिबात संधी न देता तो गेम २१-९ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तैवानच्या चाऊ तिएन चेनने समीर वर्माला २१-१०, १५-२१, २१-१५ असे तीन गेममध्ये पराभूत केले. दुहेरीतदेखील भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला थायलंडच्या देचापोल पुआवरणउकरोह आणि सॅपसिरी तेरातंचाइ या जोडीने २१-१४, २१-१६ असे पराभूत केले.