विश्व अजिंक्यपद स्पध्रेत दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अन्य भारतीय खेळाडूंना गाशा गुंडाळावा लागल्यानंतरही सिंधूने तैपेईच्या ताई त्झु यिंगवर २१-१२, २१-१५ अशी मात केली.
जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या सिंधूला याआधी तीन वेळा यिंगविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूने आधीच्या पराभवांतून बोध घेत शानदार विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने ४-२ अशी आघाडी घेतली. सातत्याने आघाडी वाढवत सिंधूने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये यिंगने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने खेळ उंचावत ८-८ अशी बरोबरी केली. यानंतर फटक्यातली अचूकता वाढवत सिंधूने १४-९ अशी आघाडी घेतली. यिंगने टिच्चून खेळ करत १३-१४ अशी पिछाडी भरून काढली. मात्र सिंधूने झुंजार खेळ करत दुसऱ्या गेमसह बाजी मारली.
पुढच्या फेरीत सिंधूचा मुकाबला चीनच्या वांग यिहानशी होणार आहे. यिहानविरुद्ध सिंधू चार वेळा पराभूत झाली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली सायना नेहवाल यांच्यासह पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.