विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत चर्वितचर्वण होत असतानाच भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने त्याची पाठराखण केली आहे. सध्याच्या घडीला कोहली हा भारतासाठी योग्य कर्णधार असून त्याला मध्यवर्ती ठेवत भारतीय संघ भविष्यातील रणनीती आखू शकतो. कोहलीवर दीर्घकाळासाठी संघ भिस्त ठेवू शकतो, असे मत द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘माझ्या मते कोहलीची एक कर्णधार म्हणून ही सुरुवात आहे. पण या छोटय़ा कालावधीमध्येही तो चांगल्या पद्धतीने संघाची धुरा वाहू शकतो, असे मला वाटते. माझ्या मते कर्णधार झाल्यावर त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याच्या धावा सर्वकाही सांगून जातात. एक कर्णधार म्हणून तुम्ही संघापुढे आदर्श ठेवायचा असतो आणि कोहलीने हीच गोष्ट आपल्या फलंदाजीतून दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय संघ व्यवस्थापन दीर्घकाळासाठी नक्कीच विश्वास ठेवू शकते,’’ असे द्रविड म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘धोनीसारख्या यशस्वी कर्णधारानंतर कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे, त्यामुळे कोहलीकडून मोठय़ा अपेक्षा अहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर धोनीचे संघातील स्थान धोक्यात आले होते, पण गेल्या काही कालावधीमध्ये कोहलीच्या कसोटी कामगिरीमध्ये लक्षणीय बदल जाणवला आहे. त्यामुळे एक युवा नायक म्हणून आपण कोहलीकडे पाहू शकतो.’’