सातत्यपूर्ण कामगिरीने चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या राहुल द्रविडने मैदानातच नव्हे तर वास्तविक जीवनातही आपण ‘जंटलमन’ असल्याची पुन्हा एकदा प्रचिती घडवून दिली आहे. बेंगळुरू विद्यापीठाने त्याला दिलेली मानद डॉक्टरेट उपाधी घेण्यास त्याने नकार दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट स्वीकारण्यास नकार दिला असून जेव्हा आपण क्रीडा क्षेत्रात संशोधन करू तेव्हाच ही उपाधी स्वीकारू असे म्हटले आहे. अत्यंत नम्रपणे त्यांने आपला नकार विद्यापीठ प्रशासनाला कळवला आहे. या नकारामुळे मात्र चाहत्यांच्या मनात त्याने आपला आदर आणखी वाढवला आहे. अनेक सेलिब्रेटिंनी सोशल मीडियावर त्याच्या या नकाराचे मोठे कौतूक केले आहे.

वर्ष २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या राहुल द्रविडचा जन्म बेंगळुरू येथेच झाला. तिथेच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या तो भारतीय ‘अ’ संघ आणि १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. बेंगळुरू विद्यापीठाचा २७ जानेवारी रोजी ५२ वा दिक्षांत समारोह आहे. या कार्यक्रमातच द्रविडला मानद डॉक्टरेट प्रदान करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु त्याने अत्यंत नम्रपणे त्याला नकार दिला. आपल्याला डॉक्टरेटसाठी निवडल्याबद्दल राहुलने विद्यापीठाचे आभार मानले. मानद डॉक्टरेट स्वीकारण्यापेक्षा मी क्रीडा क्षेत्रात संशोधन करून डॉक्टरेटची पदवी मिळवेल, असे म्हटल्याचे बेंगळुरू विद्यापीठाचे कुलगुरू बी. थिमे गौडा यांनी सांगितले.
यापूर्वी द्रविडने २०१४ मध्ये गुलबर्गा विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभातही निमंत्रण असतानाही जाण्याची टाळले होते. तिथेही त्यांना मानद डॉक्टरेटसाठी निवडले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येते. या अंतर्गतच राहुल द्रविडला ही डॉक्टरेट देण्यात येणार होती.