राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा क्रिकेटपटूंनी २०१८चा युवा विश्वचषक जिंकून विश्वविजेतेपद पटकावले. राहुल द्रविड यांनी ही जादू नेमकी कशी घडवून आणली?

भारतीय क्रिकेटसाठी २००७ हे वर्ष एक दु:स्वप्न होते. कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले. विश्वचषक जिंकून न दिल्याचा एक अपयशी शिक्का अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे त्याला वेदना देत होता. त्याआधी २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चक्क अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु ऑस्ट्रेलियाकडून पत्करलेल्या पराभवामुळे भारताचे विश्वविजेतेपद हुकले होते. पुढे २०११ च्या विश्वचषकाप्रसंगी द्रविड भारताच्या एकदिवसीय संघात नव्हता, पण भारताने जगज्जेतेपद पटकावले. या कालखंडात द्रविडने कसोटी क्रिकेटमधील आपली ‘दी वॉल’ ही प्रतीमा अखेपर्यंत जपली. निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये त्याने खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून मेहनत घेतली. परंतु क्रिकेटची राष्ट्रसेवा करण्याचे त्याच्या मनात होते. खेळाडू घडवणे, कसोटी क्रिकेटला सुगीचे दिवस आणणे हे सारे काही त्याला अस्वस्थ करीत होते. तो भलेही विश्वविजेत्या संघातील खेळाडू होऊ शकला नाही, मात्र विश्वविजेत्या संघाचा प्रशिक्षक मात्र तो जरूर झाला. भारताच्या युवा संघाने पटकावलेले हे विश्वविजेतेपद त्या द्रविडगिरीचीच फळे रसाळ गोमटी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कॅनबेरा येथे २०११मध्ये झालेल्या डॉन ब्रॅडमन व्याख्यानमालेत प्रथमच राहुल द्रविड नामक एका परदेशी क्रिकेटपटूला व्याख्यान देण्याचे भाग्य लाभले होते आणि फक्त २० मिनिटांतच त्याने हे मैदानही जिंकले. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिक, जाणकार-समीक्षकांनी द्रविडला चक्क उभे राहुल मानवंदना दिली. तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचा ऊर भरून यावा, असाच हा प्रसंग. क्रिकेटमधील भ्रष्टाचार, अतिक्रिकेट आणि वाढणाऱ्या व्यावसायीकरणामुळे क्रिकेटपटूंची होत असलेली धावपळ अशा अनेक मुद्दय़ांवर द्रविडने प्रकाशझोत टाकला. केवळ व्याख्यान देत किंवा समालोचन करून वाहिन्यांची आर्थिक रसद मिळवत द्रविड बसला नाही.

भारतीय ‘अ’ आणि युवा संघाची जबाबदारी द्रविडने सांभाळली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या आव्हानात्मक देशांचे दौरे वाढले. भारतीय युवा संघाचे हे यश हे त्यामुळेच विशेष अधोरेखित होते. वेगवान माऱ्याला पूरक ठरणाऱ्या परदेशी खेळपट्टय़ांवर नांगी टाकणारे फलंदाज आणि स्विंग, लय यांचा अभाव असलेली गोलंदाजी असे शिक्के भारताच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ संघावर मारले गेले होते.

परंतु भारतीय युवा संघाने कमाल केली. साखळीत ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे यांना हरवून भारताने झोकात बाद फेरी गाठली. मग उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश, उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने विश्वविजेतेपद पटकावले. जगज्जेतेपदाचा हा मार्ग मुळीच सोपा नव्हता. पण शुबमान गिल, पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा आणि हार्विक पटेल यांनी फलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. कमलेश नागरकोटी, शिवम मावी, इशान पोरेल यांनी न्यूझीलंडच्या वातावरणाशी जुळवून घेत वेगवान मारा केला. १४० किमी प्रती ताशी वेगापेक्षा अधिक वेगाने सातत्याने गोलंदाजी करीत कमलेशने सर्वाचेच लक्ष वेधले होते. याशिवाय अनुकूल रॉय आणि अभिषेक शर्मा यांची फिरकी या स्पध्रेत महत्त्वाची ठरली. एकंदरीत भारतीय संघाचे वर्चस्वच या स्पर्धेवर दिसून आले.

या स्पध्रेच्या कालखंडातील द्रविडच्या कुशल मार्गदर्शनाच्या दोन गोष्टी समोर आल्या. युवा विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना समोर असताना आयपीएलचा लिलाव होणार होता. त्यावेळी आपल्याला आयपीएलमधून किती उत्पन्न मिळणार, याची उत्कंठा प्रत्येक खेळाडूला असणे स्वाभाविक होते. परंतु द्रविडने आधीच आपल्या संघातील खेळाडूंना समजावून सांगितले. आयपीएलचा लिलाव दरवर्षी होतो, मात्र विश्वचषक खेळण्याची संधी आयुष्यात वारंवार येत नाही, हे त्याने खेळाडूंना पटवून दिले. त्यानंतर द्रविडचा उपदेश शिरसावंद्य मानत भारतीय संघाने दिमाखदारपणे उपांत्य फेरीचा अडसर पार केला. द्रविडने विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी मोबाइल बंदीचे आदेशसुद्धा जारी केले होते. कुटुंबीयांशी किंवा प्रसारमाध्यमांशी संवादामुळे लक्ष विचलित होऊ नये, या उद्देशाने द्रविडने ही काळजी घेतली होती.

द्रविडने भारतीय संघाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळल्यानंतर २०१६च्या विश्वचषकात भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु त्यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र विश्वविजेतेपदाच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन भारतीय संघाने हे यश मिळवले. मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत भारताने तीन वेळा युवा विश्वचषक जिंकला होता. यंदा मिळवलेले चौथे विश्वविजेतेपद हे युवा विश्वचषकातील भारताच्या वर्चस्वाची चुणूक दाखवणारे ठरले. युवा खेळाडूंच्या कामगिरीने जसे विश्वचषकाचे मैदान जिंकले, तसेच या खेळाडूंना आयपीएलच्या लिलावात चांगले भावसुद्धा मिळाले. भारताचे क्रिकेटमधील भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे, याची ग्वाही या द्रविडसेनेने दिली आहे.

भारतीय युवा संघाच्या यशाची वैशिष्ट्ये

१.     वातावरणाशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने भारतीय संघ दोन आठवडे आधी न्यूझीलंडला गेला. या कालावधीत भारतीय संघ तिथे तीन सराव सामने खेळला.

२.     २०१६ ते २०१८ या दोन युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धामधील भारताची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. भारताने श्रीलंकेत आशिया चषक जिंकला. त्यानंतर मायदेशात इंग्लंडवर ३-१ असा विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध ५-० असे निभ्रेळ यश मिळवण्याची किमया साधली. त्यामुळेच भारतीय संघाचा परदेशातील आत्मविश्वास दुणावला.

३.     भारताने साखळीत ऑस्ट्रेलियाला १०० धावांनी हरवले, त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध दहा विकेट राखून आरामात विजय मिळवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला १३१ धावांनी आणि उपांत्य फेरीत पाकिस्तानला २०३ धावांनी हरवले. मग अंतिम फेरीत पुन्हा ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले.

४.     यशस्वी सलामी ही भारताच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. भारताच्या सलामीवीरांनी भक्कम पाया उभारला. भारताच्या सलामीवीरांनी सहा सामन्यांत अनुक्रमे १८०, ६७, १५५, १६, ८९ आणि ९० अशा सलामीच्या भागीदाऱ्या केल्या. पृथ्वी शॉ, शुबमान गिल आणि मनज्योत कालरा यांनी दमदार फलंदाजी केली.

५.     विश्वचषक स्पध्रेत तिसऱ्या क्रमांकावर उतरून सातत्याने फलंदाजी करणारा शुबमान गिल भारताच्या यशाचा शिल्पकार ठरला. ६३, ९०, ८६, १०२* आणि ३१ या त्याच्या पाच डावांमधील धावा.

६.     कमलेश नागरकोटी, इशान पोरेल आणि शिवम मावी या भारताच्या वेगवान त्रिकुटाने एकंदर २४ बळी मिळवले. या तिघांच्या वेगवान माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघांचा निभाव लागला नाही.

७.     भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याचा मान फिरकी गोलंदाज अनुकूल रॉयने मिळवला. ९.०७ धावांच्या सरासरीने एकूण १४ बळी त्याने मिळवले. मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्याने केले.

८.     भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याने आघाडीवर राहून नेतृत्व केले. फलंदाजीतील सातत्यपूर्ण योगदान, क्षेत्ररक्षणाची रचना आणि गोलंदाजीतील बदल भारताच्या नेहमीच पथ्यावर पडले.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा