विश्वविजेते खेळाडू, साहाय्यक मार्गदर्शक आणि मला देण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या पुरस्कारातील आकडय़ांमध्ये असमानता का? हाच प्रश्न भारतीय युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रामाणिकपणे विचारला. आयसीसी युवा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख, साहाय्यक मार्गदर्शकांना २० लाख आणि द्रविड यांना ५० लाख रुपयांचे इनाम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले; परंतु आपल्याला अन्य साहाय्यक मार्गदर्शकांपेक्षा अधिक रकमेचे बक्षीस जाहीर केल्याबद्दल द्रविड यांनी नाराजी प्रकट करीत समान रकमेचे पारितोषिक देण्याची मागणी केली.

भारताच्या विश्वविजेतेपदाचे खरे श्रेय हे साहाय्यक मार्गदर्शकांचे आहे, अशा शब्दांत द्रविडने या यशाचे विश्लेषण केले होते. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या जगज्जेतेपदाविषयी वक्तव्यात कुठेही ‘मी’पणा नव्हता. गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक अभय शर्मा, फिजिओथेरपिस्ट योगेश परमार, सरावतज्ज्ञ आनंद दाते, मसाजतज्ज्ञ मंगेश गायकवाड आणि ध्वनिचित्रफीततज्ज्ञ देवराज राऊत या सर्वाच्या योगदानाचे कौतुक होते. काही वर्षांपूर्वी याच द्रविड यांच्यापुढे राष्ट्रीय सेवा की आयपीएल हा प्रश्न समोर उभा ठाकला होता. लोढा समितीच्या शिफारशींमुळे हितसंबंधांचा मुद्दा ऐरणीवर होता. मात्र भारतीय अ संघ आणि युवा संघाला घडवण्याचे कार्य श्रेष्ठ मानणाऱ्या द्रविड यांनी भरघोस उत्पन्न देणाऱ्या आयपीएलवर काट मारण्यात कोणताही संकोच बाळगला नाही. मागील युवा विश्वचषकात उपविजेतेपद आणि यंदा विजेतेपद ही संघाची कामगिरीच विलक्षण बोलकी आहे. याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखालील दोन्ही संघ देशात आणि परदेशांत विजयी कामगिरी करीत आहे.

युवा विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधी आयपीएलचा लिलाव होता. त्या वेळी खेळाडूंचे या महत्त्वाच्या सामन्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून द्रविडने सर्वाना उपदेश केला की, आयपीएलचा लिलाव दर वर्षी होतो, मात्र विश्वचषक खेळण्याची संधी आयुष्यात वारंवार येत नाही. खेळाडूंना जगज्जेतेपदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी योग्य वेळी त्यांचे कान धरण्यातही कसूर केली नाही. निवृत्तीनंतर भाषणे, समालोचन असे बरेच काही करून पाहिले; परंतु खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात मी सर्वात जास्त रमतो, हे द्रविड अभिमानाने सांगतात.

यशानंतरची आर्थिक समीकरणे जुळवण्यात बऱ्याचशा खेळातील खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना रस असतो. मात्र भारतीय क्रिकेटमध्ये एक अलिखित परंपरा सुरू आहे. आपल्याला मिळणाऱ्या वैयक्तिक बक्षिसांच्या रकमेतील मोठा वाटा त्या खेळाडूला दिला जातो आणि उर्वरित रक्कम बाकी खेळाडूंमध्ये विभागली जाते. मात्र बक्षिसाची भेटवस्तू त्याला अपवाद असायची. १९८५च्या व्हीबी सीरिज जागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या रवी शास्त्री यांना ऑडी कार बक्षीस मिळाली, तेव्हा कार विकून मिळालेले पैसे सर्व खेळाडूंना समान वाटावे, असा सल्ला एकाने गमतीने दिला होता.

अगदी युवा विश्वचषकाचा विचार जरी केला तरी डेव्ह व्हॅटमोर (२००८) आणि भरत अरुण (२०१२) या प्रशिक्षकांनासुद्धा विराट कोहली किंवा उन्मुक्त चंद यांच्याइतकी पुरस्काररक्कम मिळाली नव्हती. केंद्रातील अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी समान रकमेचे बक्षीस दिले जाते. राज्यातील शिवछत्रपती आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठीसुद्धा समानतेचा नियम राबवला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित करताना मात्र राज्य शासन हा समानतेचा नियम वापरत नाही. काही वर्षांपूर्वी विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पराक्रम गाजवणाऱ्या तीन महिला कबड्डीपटूंना शासनाने एक कोटी रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले होते. त्या वेळी प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांना मात्र फक्त २५ लाखांचे बक्षीस देण्यात आले. २०१६ मध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला राज्य शासनाने ७५ लाखांचे बक्षीस दिले, परंतु प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना मात्र २५ लाखच बक्षीसस्वरूपात देण्यात आले. प्रशिक्षक हा मुद्दा विचारात घेताना खेळाडूला घडवणारा आणि संघासोबत असणारा असे दोघेही महत्त्वाचे ठरतात.

खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील बक्षीसरकमेची तफावत बऱ्याचदा असते. परंतु कुणीही आपल्याला मिळालेली रक्कम स्वीकारतो. अन्य कुणाला किती मिळाले, याकडे लक्ष देत नाही; परंतु द्रविड यांची निष्ठा आणि दृष्टिकोन यातून एक आदर्श गुरुनीती समोर येत आहे.

खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शक या सर्वानाच समान रकमेचे बक्षीस बीसीसीआयने द्यावे, असे माझे मत आहे. कोणतेही विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व जण सांघिक भावनेने प्रयत्न करीत असतात. बक्षिसाच्या समानतेमुळे कोणाच्या मनात कटुता राहत नाही. मला कमी का किंवा जास्त का, हे प्रश्न कुणालाही पडणार नाहीत. राहुल द्रविडने आपल्या कृतीतून एक प्रकारे औदार्य दाखवले आहे. ती एक वेगळ्या धाटणीची व्यक्ती आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी त्याने ती नाकारण्याचे धारिष्टय़ दाखवले होते. क्रीडा क्षेत्रातील संशोधन करून ती मी मिळवेन, असे द्रविडने सांगितले होते.

– दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार