फझलचे शतक ६ बाद २८४ धावा

फैझ फझल (१२६) आणि आदित्य शनवारे (५५) यांच्या शतकी सलामीच्या जोरावर यजमान विदर्भने रणजी क्रिकेट स्पध्रेत हरयाणाविरुद्ध पहिल्या दिवशी ६ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ संपला, त्या वेळी रवी जांगीड (१) खेळत होता.
बाद फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत फझल आणि शनवरे या सलामीवीरांनी खेळपट्टीवर ठाण मांडून ११६ धावांची भागीदारी केली. १२४ चेंडूंत ७ चौकार व एक षटकार लगावून ५५ धावांची खेळी करणाऱ्या शनवरेला चैतन्य बिष्णोईने त्रिफळाचीत केले. त्यानंतर गणेश सतीश व कर्णधार एस. बद्रिनाथ यांना हर्षल पटेलने स्वस्तात बाद केले.
खेळपट्टीवर नांगर रोवून बसलेल्या फझलने चौथ्या विकेटसाठी अनुभवी फलंदाज वसीम जाफरसह ९२ धावांची भागीदारी करून संघाला पूर्वपदावर आणले. जयंत यादवने जाफरला बाद करून ही जोडी तोडली. त्यानंतर फझलने जितेश शर्मासह पाचव्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. शर्माला युजवेंद्र चहलने माघारी पाठवले. दिवसाच्या अखेरच्या षटकात यादवने फझलला बाद केले. फझलने २६६ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह १२६ धावा चोपल्या. हरयाणाकडून हर्षल पटेल (२-४१) व जयंत यादव (२-९७) यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.

धावफलक
विदर्भ : आदित्य शनवरे त्रि. बिष्णोई ५५, फैझ फझल पायचीत गो. जयंत यादव १२६, गणेश सतीश झे. सैनी गो. हर्षल पटेल ५, एस. बद्रिनाथ पायचीत गो. हर्षल पटेल ६, वसीम जाफर झे. व गो. जयंत यादव ४१, जितेश शर्मा झे. पटेल गो. युगवेंद्र चहल ३०, रवी जांगीड खेळत आहे १.
अवांतर – २०; एकूण – ८९.१ षटकांत ६ बाद २८४
गोलंदाज : हर्षल पटेल १२-२-४१-२, आशीष हुडा १२-४-२९-०, युजवेंद्र चहल २४-३-७७-१, जयंत यादव ३०.१-३-९७-२, चैतन्य बिष्णोई १०-१-३०-१.