जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेऊन सौराष्ट्राने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गेल्या ८ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल ४ वेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, मात्र या चारही वेळा त्यांना अपयश आलं. अखेरीस बंगालविरुद्ध सामन्यात सौराष्ट्राने आपली विजयाची प्रतीक्षा संपवली आहे.

पहिल्या डावात फलंदाजी करताना सौराष्ट्राने ४२५ धावांचा डोंगर उभा केला. घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळणाऱ्या सौराष्ट्राने बंगालच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अर्पित वसवडाचं शतक आणि त्याला चेतेश्वर पुजारा-अवि बारोट-विश्वराज जाडेजा या त्रिकुटाने अर्धशतकी खेळी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर सौराष्ट्राने पहिल्या डावावर वर्चस्व गाजवलं. बंगालच्या गोलंदाजांनी पहिल्या काही दिवसांमध्ये प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र त्यांच्या पदरी अपयशच पडलं. अंतिम सामन्याची खेळपट्टी अतिशय खराब बनवण्यात आल्याची टीकाही बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी केली होती. पहिल्या डावात बंगालकडून अक्षदीपने ४, शाहबाज अहमदने ३, मुकेश कुमारने २ तर इशान पोरेलने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल बंगालच्या फलंदाजांनाही चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला सुदीप चॅटर्जी, यानंतर मधल्या फळीत वृद्धीमान साहा, अनुस्तुप मुजुमजार यांनी अर्धशतकी खेळी करत बंगालची झुंज सुरु ठेवली. सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करताना या फलंदाजांनी काही चांगले फटके खेळले. मात्र मोक्याच्या क्षणी या फलंदाजांना बाद करण्यात सौराष्ट्राचे गोलंदाज यशस्वी ठरले. अखेरच्या फळीत अर्नब नंदीने ४० धावांची खेळी करत चांगली झुंज दिली, मात्र अखेरच्या दिवशी सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने इशान पोरेलला माघारी धाडत सौराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राने रणजी करंडकाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.