महाराष्ट्राला निर्णायक विजयाची संधी

अनुपम संकलेचाने घेतलेल्या आठ बळींच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी क्रिकेट सामन्यात आसामला फॉलोऑन दिला व निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल केली. डावाचा पराभव टाळण्यासाठी आसामला आणखी १७१ धावांची आवश्यकता असून, अद्याप त्यांचे चार फलंदाज बाद व्हायचे आहेत.

महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ५४२ धावांना उत्तर देताना आसाम संघाने ३ बाद १३२ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. सलामीवीर रिषव दासने झुंजार फलंदाजी करीत ११ चौकारांसह ८६ धावा केल्या. त्याने कुणाल सैकिया (७ चौकारांसह ३४) याच्या साथीत ७८ धावांची भर घातली तर अरुण कार्तिकच्या (८ चौकार व एक षटकारासह ४७) साथीने ८५ धावांची भागीदारी केली. कार्तिक व दास हे दोघे लागोपाठ बाद झाल्यानंतर आसामच्या डावाची घसरगुंडी उडाली. त्यांचा डाव ७७ षटकांमध्ये २५६ धावांवर आटोपला. महाराष्ट्राकडून संकलेचा या वेगवान गोलंदाजाने केवळ ७३ धावांमध्ये आठ बळी घेतले. त्याने नुकत्याच झालेल्या विदर्भविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत प्रत्येकी ७ बळी घेतले होते व संघाला निर्णायक विजय मिळवून दिला होता.

आसामवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतरही दुसऱ्या डावात संकलेचा याच्या भेदक माऱ्यापुढे त्यांच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. त्याने ३७ धावांत तीन बळी घेत आसामची ४६ षटकांत ६ बाद ११५ अशी स्थिती केली. आसामकडून कुणाल सैकिया (३३) व अरुण कार्तिक (नाबाद ३३) यांनी चिवट झुंज दिली. मात्र त्यांना अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. सामन्याचा गुरुवारी शेवटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राचे गोलंदाज आसामचा दुसरा डाव किती झटपट गुंडाळतात, हीच उत्सुकता बाकी आहे.

संक्षिप्त धावफलक

  • महाराष्ट्र (पहिला डाव) : सर्वबाद ५४२
  • आसाम (पहिला डाव) : ७७ षटकांत सर्वबाद २५६ (रिषव दास ८६, कुणाल सैकिया ३९, अरुण कार्तिक ४७; अनुपम संकलेचा ८/७३)
  • आसाम (दुसरा डाव) : ४६ षटकांत ६ बाद ११५ (कुणाल सैकिया ३३, अरुण कार्तिक खेळत आहे ३३; अनुपम संकलेचा ३/३७)

 

श्रेयस द्विशतकाच्या उंबरठय़ावर ; पहिल्या डावात मुंबई अद्याप १०९ धावांनी पिछाडीवर

हुबळी : धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने नाबाद १९१ धावांची दमदार खेळी साकारल्यामुळे मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील अ-गटात गुजरातविरुद्ध ६ बाद ३२६ अशी मजल मारता आली. तिसऱ्या दिवसअखेर गुजरातच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून मुंबईचा संघ १०९ धावांच्या अंतरावर असून, त्यांचे चार फलंदाज बाकी आहेत.

प्रियांक किरीट पांचाळच्या २३२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर गुजरातने पहिल्या डावात ४३७ धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईने ३ बाद ५८ धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. कर्नाटकमधील राजनगर स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात बुधवारी २२ वर्षीय श्रेयसने मुंबईचा डाव सावरला. श्रेयसने ३१० चेंडूंत १८ चौकार आणि २ षटकारांसह आपली खेळी साकारली. धवल कुलकर्णीने १८७ चेंडूंत ११ चौकारांसह ६१ धावा करताना त्याला छान साथ दिली. श्रेयस आणि धवल यांनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भक्कम भागीदारी रचली. गुजरातकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टिच्चून गोलंदाजी करताना ४९ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

  • गुजरात (पहिला डाव) : ४३७
  • मुंबई (पहिला डाव) : ११५ षटकांत ६ बाद ३२८ (श्रेयस अय्यर नाबाद १९१, धवल कुलकर्णी ६१; जसप्रीत बुमराज ४/४९)