विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीदरम्यान भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला हेल्मेटवर बॉल आदळल्याने झालेल्या दुखापतीमुळे संघातलं स्थान गमवावं लागलं. भारतीय संघ व्यवस्थापनाने Concussion Substitute नियमाचा वापर करत युजवेंद्र चहलला संधी दिली. यानंतर गोलंदाजीच चहलने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाने चहलला बदली खेळाडू म्हणून खेळवण्यावर आक्षेप घेतला.

मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनीह सामन्यादरम्यान सामनाधीकारी डेव्हिड बून यांच्याशी बोलत चहलला खेळवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक आजी-माजी खेळाडूंनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अखेरीस BCCI मधील सूत्रांनी त्यावेळी नेमकं काय घडलं यावर प्रकाश टाकला आहे. “ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर जाडेजाला चक्कर आल्यासारखं जाणवत होतं. संजू सॅमसनने त्याला पहिल्यांदा पाठवलं. त्याने ही बाब मयांक अग्रवालला सांगितली, मयांकने तात्काळ टीमच्या डॉक्टरला ही बाब सांगितली. डॉक्टरांनी तात्काळ जाडेजाची तपासणी केली आणि त्याच्या मानेला व डोक्याला बर्फाने शेक देण्यास सुरुवात केली. टीम मॅनेजमेंटमधील सर्व जणं चिंतेत होतो. बर्फाचा शेक दिल्यानंतरही त्याला बरं वाटत नव्हतं.” बीसीसीआयमधील सूत्रांनी Cricbuzz शी बोलताना माहिती दिली.

“त्याआधी जाडेजाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे तो गोलंदाजी करु शकणार नाही हे आम्हाला कळून आलं. त्याच्या दुखापतीनंतर अनेक जण मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. परंतू एखाद्या खेळाडूला झालेल्या दुखापतीचा फायदा घेत आम्ही बदली खेळाडू संघात घेऊ असा विचार करणं हे खूप दुर्दैवी आहे. जाडेजा खेळू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही सामनाधिकारी डेव्हीड बून यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीच्या चर्चेत जसप्रीत बुमराह आणि चहल हे दोन पर्याय बदली खेळाडू म्हणून उपस्थित होते. पण परिस्थिती पाहता चहलच्या पर्यायाला हिरवा कंदील मिळाला.”

डेव्हीड बून आणि जस्टीन लँगर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती नाही. त्यावेळी आमच्या ड्रेसिंग रुममधला एकही व्यक्ती तिकडे हजर नव्हता. सध्या बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजाच्या दुखापतीकडे लक्ष देऊन आहे. त्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुप धारण करु शकते याचा अंदाज आहे, म्हणूनच जाडेजा यामधून लवकरच सावरावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलं.