सिडनी : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला असून तो मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शनिवारी जडेजाला ही दुखापत झाली.

मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला गेला. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. ‘‘जडेजाला बरा होण्यासाठी ४ ते ६ आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही. भारताला कसोटी वाचवायची असल्यास, जडेजा वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्याची शक्यता आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. जडेजाने पहिल्या डावात २८ धावा करताना चार बळी मिळवले होते. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कोपराला दुखापत झाली असली तरी तो फलंदाजीस उतरणार असल्याचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेदरम्यानसुद्धा जडेजाला स्नायूंच्या दुखापतीमुळे दोन ट्वेन्टी-२० सामने आणि पहिल्या दोन कसोटींना मुकावे लागले होते.