आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबररोजी कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. या आधी सर्व संघमालकांनी आपल्या संघाकडून काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. त्यामुळेच आता आयपीएल पुन्हा चर्चेत आलं आहे. अनेक संघांनी नामांकित खेळाडूंना करारमुक्त केल्याने सोशल मिडियावरही यासंदर्भात बरीच चर्चा आहे. अशाच भारतीय संघातील आघाडीचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा यंदाच्या हंगामात मुंबईकडून खेळणार का या प्रश्नाची सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा होताना दिसत आहे. ही चर्चा होण्यामागील कारण आहे चेन्नई सुपरकिंग्सने या प्रश्नाला दिलेले उत्तर.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणाऱ्या रविंद्र जाडेजा सध्या सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये मागील अनेक वर्षांपासून चेन्नईकडून जाडेजा खेळत आहे. चेन्नईच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी तो एक आहे. चेन्नईसाठी जाडेजाने ११६ सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने १३०.२२ च्या सरासरीने १ हजार २१ धावाही केल्या आहे. तसेच गोलंदाजीमध्येही त्याने ९० बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या चेन्नईच्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. इतकी भन्नाट कामगिरी करणाऱ्या जाडेजाला चेन्नई करारमुक्त करण्याची शक्यताच नाही. मात्र तरीही जाडेजा यंदा चेन्नईऐवजी मुंबईकडून खेळणार का याबद्दल चर्चा होण्यामागील कारण ठरलं आहे मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने विचारलेला एक प्रश्न.

राघुल नावाच्या एका व्यक्तीने ट्विटवरुन यंदा जाडेजा मुंबईकडून खेळला तर असा प्रश्न ट्विटवर विचारला. “यंदा जडेजाला मुंबईकडून खेळू दिले तर? याबद्दल तुम्हाला काय वाटते चेन्नई सुपरकिंग्स?,” असे ट्विट राघुलने सीएसकेच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुन केले.

राघुलच्या या प्रश्नाला सीएसकेच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन साध्या सरळ आणि सोप्या भाषेता अवघ्या दोन शब्दांमध्ये उत्तर देण्यात आले आहे. जाडेजाला मुंबईकडून खेळू द्यावे या मागणीला सीएसकेने “(ही) अशक्य मोहीम (आहे)” असं उत्तर दिलं आहे.

यंदाच्या हंगामामध्ये सीएसकेने सॅम बिलिंग्स, ध्रुव शौरी, मोहित शर्मा, डेव्हिड व्हिली आणि चैतन्य बिश्नोई या पाच खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. ‘प्लेअर ट्रान्सफर विंडो’मध्ये सीएसकेने कोणताही खेळाडू संघात घेतलेला नाही.

तीन वेळा विजेता ठरलेल्या सीएसकेने आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावामध्ये सीएसके कोणावर बोली लावते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.