कोहली, डी’व्हिलियर्स यांची अर्धशतके; विल्यमसनचे १३ धावांत ३ बळी
घरच्या मैदानावर पुण्याच्या गोलंदाज व फलंदाजांनी सपशेल निराशा केली. त्यामुळेच त्यांना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली व ए बी डी’व्हिलियर्स यांनी शतकी भागीदारी करीत बंगळुरू संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
पुणे सुपरजायंट्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र बंगळुरूच्या विराट कोहली व ए बी डी’व्हिलियर्स यांनी चौफेर फटकेबाजी करीत त्याचा निर्णय सपशेल अपयशी ठरवला आणि ३० हजार प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बंगळुरू संघाने २० षटकांत ३ बाद १८५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे संघाने निर्धारित षटकांत ८ बाद १७२ धावा केल्या. बंगळुरू संघाचा सलामीवीर के.एस.राहुलला दोन जीवदानांचा लाभ घेता आला नाही. केवळ सात धावा काढून तो बाद झाला. चौथ्या षटकांत ही विकेट गमावल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या डी’व्हिलियर्सने कोहलीच्या साथीत खेळाचा रंगच पालटून टाकला. त्यांनी पुण्याच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत धावफलक सतत हालता ठेवला. षटकामागे आठ धावांच्या सरासरीने त्यांनी टोलेबाजी केली व प्रेक्षकांच्या आतषबाजीची मागणी पूर्ण केली. डी’व्हिलियर्सने स्वत:चे अर्धशतक षटकार मारुनच साजरे केले. ही जोडी फोडण्यासाठी पुण्याचा कर्णधार धोनी याने गोलंदाजीत वारंवार बदल केला. तथापि, त्याचा काहीही परिणाम डी’व्हिलियर्स व कोहली यांच्या फटकेबाजीवर झाला नाही. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १६ षटकांत १५५ धावांची भागीदारी रचली. डावाच्या शेवटच्या षटकांत थिसारा परेराने या जोडीला तंबूत धाडले. सलामीवीर कोहलीने ६३ चेंडूंत ८० धावा केल्या. त्यामध्ये सात चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. डी’व्हिलियर्सने ४६ चेंडूंमध्ये ८३ धावा करताना सहा चौकार व चार षटकार अशी टोलेबाजी केली.
पुण्याच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी फॅफ डू प्लेसिस व स्टीव्हन स्मिथ यांना अवघ्या १८ धावांमध्ये गमावले. मात्र त्यानंतर धोनी व रहाणे यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत षटकामागे सहा ते सात धावांचा वेग ठेवला. रहाणेने अर्धशतक केवळ ३७ चेंडूंमध्ये पूर्ण केले. रहाणे व धोनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भर घातली. रहाणेने ४६ चेंडूंमध्ये आठ चौकारांसह ६० धावा केल्या. पाठोपाठ धोनीही बाद झाला. त्याने तीन चौकारांसह ४१ धावा केल्या. परेरा व रजत भाटिया यांनी तडाखेबाज खेळ करीत १८ व्या षटकांत २५ धावा वसूल केल्या आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. परेराने तीन षटकार व तीन चौकारांसह ३४ धावा केल्या, मात्र १९ व्या षटकांत शेन वॉटसनने परेरा व रविचंद्रन अश्विन यांना बाद केले. शेवटच्या षटकांतही पुण्याने दोन विकेट्स गमावत पराभव ओढवून घेतला.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ३ बाद १८५ (विराट कोहली ८०, अब्राहम डी’व्हिलियर्स ८३; थिसारा परेरा ३/३४) विजयी वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ८ बाद १७२ (अजिंक्य रहाणे ६०, महेद्रसिंग धोनी ४१, थिसारा परेरा ३४; केव्हिन रिचर्डसन ३/१३, शेन वॉटसन २/३१)

सामनावीर : ए बी डी’व्हिलियर्स.