रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) विस्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) आपली ऑल टाइम प्‍लेइंग इलेवनची निवड केली आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या डिव्हिलियर्सने आपल्या संघाच्या कर्णधारपदी मात्र कोहलीऐवजी महेंद्रसिंग धोनीची निवड केलीये. यासोबतच त्याने आपल्या संघात सात भारतीय खेळाडूंना स्थान दिलं आहे.

डिव्हिलियर्सच्या ‘ऑल टाइम IPL XI’ संघात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा आणि रोहित शर्मा अशा दिग्गज भारतीय खेळाडूंना स्थान मिळालंय. आपल्या संघात त्याने सलामीवीर म्हणून विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माला जागा दिली आहे.

डिव्हिलियर्सने आपल्या संघात तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला ठेवलंय. चौथ्या क्रमांकावर त्याने तीन फलंदाजांची नावं ठेवलीत. यात स्वतःच्या नावासोबतच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथचा समावेश आहे. अष्टपैलू म्हणून त्याने संघात बेन स्टोक्स आणि रविंद्र जडेजा या दोघांचा समावेश केला आहे. डिव्हिलियर्सने स्टोक्सला पाचव्या क्रमांकावर आणि जडेजाला सातव्या क्रमांकावर ठेवलंय. तर, सहाव्या क्रमांकावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. यष्टीरक्षक म्हणूनही डिव्हिलियर्सने धोनीचीच निवड केली आहे.

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खाननेही डिव्हिलियर्सच्या संघात जागा पटकावली आहे. डिव्हिलियर्सने आपल्या संघात तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिलंय. यात सनरायझर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार, दिल्ली कॅपिटल्सचा कगिसो रबाडा आणि मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.

एबी डिव्हिलियर्सची आयपीएल 11: विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन/स्टीव्ह स्मिथ/एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, रबाडा आणि जसप्रीत बुमराह.