२०१७च्या हंगामातील पाचवे जेतेपद; रोनाल्डोचा निर्णायक गोल; ग्रेमिओ क्लबवर १-० असा विजय

रिअल माद्रिद आणि जेतेपद हे समीकरण जणू घट्टच बनले आहे. २०१७च्या हंगामात ला लिगा, चॅम्पियन्स लीग़, यूएफा सुपर चषक आणि स्पॅनिश सुपर चषक या स्पर्धापाठोपाठ रिअल माद्रिदने रविवारी क्लब विश्वचषकावरही नाव कोरत जेतेपदाचा ‘पंचक’ साजरा केला. पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डो विजयाचा शिल्पकार ठरला. मध्यंतरानंतर फ्री किकवर त्याने केलेला गोल माद्रिदच्या जेतेपदासाठी निर्णायक ठरला. माद्रिदने मागील चार वर्षांत तिसऱ्यांदा क्लब विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करताना कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना क्लबच्या विक्रमाशी बरोबरी केली.

‘‘रिअल माद्रिदने एका वर्षांत पाच जेतेपद कधी पटकावली नव्हती आणि त्यामुळे आम्हाला विजय मिळवायचाच होता,’’ अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने सामन्यानंतर दिली. रोनाल्डोने या हंगामात २० सामन्यांत १५ गोल केले आहेत. मात्र ला लिगा स्पर्धेत क्लबची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याबद्दल रोनाल्डो म्हणाला, ‘‘माझ्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मी मैदानावरील कामगिरीने उत्तर देईन. क्लबची कामगिरी अविश्वसनीय झाली आहे आणि माझ्या खात्यात आणखी एक जेतेपद जमा झाले आहे.’’

ल्युक मॉड्रिकला ‘गोल्डन बॉल’

रिअल माद्रिदच्या खेळाडूंनी पुरस्कारांमध्येही वर्चस्व गाजवले. २०१६च्या क्लब विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या मॉड्रिकने यंदा सर्वोत्तम खेळ करताना यंदाचा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार पटकावला. ख्रिस्तियानो रोनाल्डो ‘सिल्व्हर बॉल’ आणि जॉनथन उरेताव्हिस्काया (पॅचुका) ‘ब्राँझ बॉल’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

  • रिअल माद्रिद क्लबने पहिल्यांदाच एका वर्षांत पाच जेतेपद पटकावण्याची किमया केली.
  • ख्रिस्तियानो रोनाल्डो क्लब विश्वचषक स्पर्धेच्या सलग दोन अंतिम लढतीत गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला.
  • ख्रिस्तियानो रोनाल्डोने क्लब विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ७ गोल नोंदवण्याचा विक्रम केला आहे.
  • टेले सँटाना यांच्या मार्गदर्शनाखाली साओ पाऊलो क्लबने १९९२ व १९९३च्या हंगामात आंतरउपखंडीय चषक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर क्लब विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सलग जेतेपद जिंकणारा माद्रिद हा पहिला क्लब ठरला.
  • क्लब विश्वचषक स्पर्धेची सर्वाधिक तीन जेतेपद पटकावणाऱ्या बार्सिलोना क्लबच्या विक्रमाशी माद्रिदने बरोबरी केली आहे.

जेतेपदाचा चषक उंचावताना कुणीच थकत नाही. आमच्यासाठी हे ऐतिहासिक आणि अविश्वसनीय वर्ष आहे. क्लबमधील प्रत्येक खेळाडूच्या अथक मेहनतीचे हे फलित आहे. सलग जेतेपद पटकावण्याच्या विक्रमाची आम्हाला माहिती होती आणि त्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्ही सर्वोत्तम खेळ केला. आता पुढेही सातत्यपूर्ण खेळ करण्याची आवश्यकता आहे.    – सर्गिओ रामोस, रिअल माद्रिदचा कर्णधार