ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या किमान मर्यादित षटकांच्या मालिकांसाठीही भारतीय संघात स्थान न लाभल्याने मी फार निराश झालो होतो, परंतु रोहित शर्माच्या सल्ल्याने मला सावरले, अशी कबुली मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने दिली.

३० वर्षीय सूर्यकुमारने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये चार अर्धशतकांसह ४८० धावा केल्या. त्याशिवाय सय्यद मुश्ताक अली आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही गेल्या दोन हंगामांपासून तो सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी किमान ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात आपली निवड होईल, अशी सूर्यकुमारला अपेक्षा होती.

‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवडीची घोषणा झाली त्यावेळी मी आणि रोहित जिममध्ये व्यायाम करत होतो. स्वत:ची निवड न झाल्याचे कळताच पुढील काही काळ मी फार शांत तसेच निराश झालो होतो. मात्र त्यावेळी रोहितने सर्वप्रथम माझ्याशी संवाद साधला. ‘इतक्या सहज हार मानू नकोस. तुझे कार्य करत राहा, तुला नक्कीच फळ मिळेल. मीसुद्धा या प्रकारच्या परिस्थितीतून मार्गक्रमण केले आहे’, अशा आशयाचे रोहितचे शब्द मला धीर देणारे ठरले,’’ असे सूर्यकुमार म्हणाला.

रोहितच्या सल्ल्यामुळेच बेंगळूरुविरुद्धच्या लढतीत मी आत्मविश्वासाने फलंदाजीसाठी उतरलो आणि संघाला विजय मिळवून देऊ शकलो, असेही सूर्यकुमारने सांगितले. त्याशिवाय या खेळीदरम्यान विराट कोहलीशी माझी चकमक झाल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. परंतु प्रत्यक्षात आमच्यात कोणतेही वैर नसून सामना संपल्यानंतर कोहलीने स्वत: येऊन माझे अभिनंदनही केले आणि मीसुद्धा त्याचा फार आदर करतो, असे सूर्यकुमारने स्पष्ट केले.