चंद्रकांत पंडित

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सुरुवातीचे सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला होता. पावसाच्या व्यत्ययाने न्यूझीलंडचा सामना रद्द झाला. मग भारत-पाकिस्तान म्हणजे क्रिकेटमधील महायुद्ध. पावसाचे सावट असल्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागेल, हा प्रश्न सर्वानाच होता. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नव्हता. लोकेश राहुल हा चौथ्या क्रमांकावरून सलामीलाच फलंदाजीसाठी येणार होता. भारताच्या मधल्या फळीमध्ये चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचे, या विषयात सर्वच गुंतले होते. या सर्व प्रश्नांचे ओझे डोक्यावर घेऊन भारतीय संघ सामना खेळायला उतरला. परंतु या सर्वामध्ये जमेची बाजू होती ती म्हणजे कर्णधार विराट कोहलीचा संयम. आम्ही अगदी शांतपणे हा सामना खेळणार आहोत, असे त्याने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले होते.

पाकिस्तान संघाकडे कोणत्याही दिवशी अनपेक्षित धक्का देण्याची क्षमता आहे. पण भारतीय संघाकडे उत्तम रणनीती होती. पाकिस्तान संघाच्या फलंदाजीत कोणतीही ताकद दिसली नाही, यात गचाळ क्षेत्ररक्षणाची भर पडली. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तान भारताविरुद्ध सहा सामने हरला होता. इतिहास हा इतिहास आहे, पण शेवटी नवा सामना, नवा दिवस, नवी जागा अशा खूप गोष्टींचा विचार करून हा सामना खेळला जाणार होता.

रोहित शर्माची फलंदाजी कौतुकास्पद होती, कारण आक्रमक फलंदाजीची कला दाखवून तो भल्या-भल्या गोलंदाजांची लय बिघडवतो. पण राहुलचेही कौतुक करायला हवे. त्याने मोहमद आमिर, वहाब रियाझ अशा दोन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजाचा हिमतीने सामना केला. राहुलने रोहितसोबत एकेरी-दुहेरी धावा काढण्याचा समन्वयदेखील चांगला ठेवला. त्यामुळे रोहितवरचे दडपण कमी झाले. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची योजना त्यांनी तंतोतंत मैदानावर उतरवली आणि १३६ धावांची भागिदारी करून भारताची बाजू भक्कम केली. विराटनेसुद्धा थोडय़ा संयमाने आणि उत्तम साथीने धावांमध्ये भर घातली. रोहित बाद झाल्यानंतर विराटने भारताची फलंदाजीची बाजू सांभाळून घेतली. ३५० धावांचा पल्ला आपल्याला सहज गाठता येईल, या पद्धतीने विराट फलंदाजी करत होता.

हार्दिक पंडय़ा हा १२ षटके बाकी असताना आल्यानंतर त्याला ती जबाबदारी पार पाडण्यात अपयश आले. त्यानंतर विजय शंकरऐवजी केदार जाधव पाठवणे योग्य ठरले असते. कारण इथे शेवटच्या १० षटकांमध्ये धावा वाढवायच्या होत्या. डोक्यावरती पावसाचा सावट असताना विराट एका बाजूने धावा करत होता. त्याला एक चांगली साथ मिळण्यासाठी एक अनुभवी खेळाडूची गरज होती. केदार जाधवने ५०पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळल्यामुळे त्याच्याकडे जो अनुभव आहे. त्याचा आपण वापर करून घ्यायला हवा होता.

पाकिस्तानसाठी ३३६ धावांचे आव्हान माठे होते. ‘करा किंवा मरा’ ही परिस्थिती पाकिस्तानची होती. कारण त्यांना जिंकणे फार जरुरीचे होत. परंतु त्याच्या दृष्टिकोनातून असे वाटले नाही. म्हणूनच ते खेळताना मला असे वाटले की, १५-२० वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा संघ आणि आत्ताचा संघ यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतापुढे पाकिस्तानचा संघ खेळताना कदाचित तो बांगलादेशचा किंवा अफगाणिस्तानचा संघ असल्यासारखे वाटत होते.

मोहम्मद शमीला कुलदीप यादवच्या जागी घेतील असे मला वाटत होते. परंतु खेळपट्टी पाहिल्यानंतर संघ व्यवस्थापनेने कुलदीप यादवला कायम ठेवण्याचा निर्णय अनुकूल ठरला. खेळपट्टी एकदम कोरडी होती. त्यामुळे दोन्ही फिरकी गोलंदाज आपल्या कामी येतील, या उद्दिष्टाने कुलदीपला ठेवले होते. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने चांगली सुरुवात करून दिली. समोरच्या संघाला आक्रमक गोलंदाजी करून दडपणाखाली आणले. परंतु शिखर धवननंतर आणखी एक मोठा धक्का भारताला बसला, तो म्हणजे भुवनेश्वर कुमारला झालेली दुखापत.

पहिला सामना खेळत असताना विजय शंकरनेदेखील चांगली गोलंदाजी केली. एकूणच भारताची एकसंघता दिसत होती. एका उद्देष्टाने ते खेळत होते. विराटच्या संपूर्ण संघाला माहीत होते की, या सामन्यात आपल्याला काय करायचे आहे. क्षेत्ररक्षणाचादेखील चांगला प्रभाव या वेळी दिसला. एक वेगळ्या पद्धतीने खेळताना भारताचा संघ दिसला. तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययाने झाला नसला तरी पहिल्या दोन सामन्यांतील गती आणि जोश भारताच्या चौथ्या सामन्यात दिसून आला.