दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी दुमिनी याने खांद्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. या दौऱ्यातून दुखापतीमुळे माघार घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी बोटाच्या दुखापतीमुळे हाशिम अमलाने माघार घेतली होती. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका संघ तीन एकदिवसीय तर एक टी-२० सामना खेळणार आहे. ‘‘त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे तो किती काळ क्रिकेटपासून दूर राहील, हे आताच सांगणे कठीण आहे,’’ असे आफ्रिकेचे संघ व्यवस्थापक आणि डॉक्टर मोहम्मद मूसाजी यांनी सांगितले.

दरम्यान, १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मझांसी सुपर लीग स्पर्धेतही केपटाऊन ब्लिट्झ टीमचा खेळाडू दुमिनी खेळू शकणार नाही.