भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये सुरुवात होणार आहे. नवीन वर्षातला भारतीय संघाची ही पहिली कसोटी मालिका असल्यामुळे विजयी सुरुवात करण्याचं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. वेलिंग्टनच्या मैदानात वाऱ्याची दिशा आणि खेळपट्टी हे दोन घटक खूप महत्वाचे ठरतात. त्यातच रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्यामुळे, भारतीय संघासमोर सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. विराट कोहलीने सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वी शॉला सलामीला येण्याची संधी मिळू शकते असे संकेत दिले आहेत. याचसोबत ऋषभ पंतला संधी मिळणार की नाही हा देखील एक प्रश्न आहेच…पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने ऋषभला मोलाचा सल्ला दिला आहे.

“आपण ज्या परिस्थितीमधून जात आहोत ती सध्या खडतर आहे हे ऋषभने स्विकारायला हवं. पण त्याने सकारात्मक रहायला हवं, इतर खेळाडूंकडून जेवढं काही शिकता येईल तेवढं शिकून घ्यावं. मग तो खेळाडू सिनीअर असो किंवा ज्यूनिअर…माझ्यामते संघाबाहेर बसणं कोणत्याही खेळाडूला आवडत नाही. पण एखाद्या सामन्यात टीम कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बसत नसाल तर ते देखील तुम्हाला स्विकारता यायला हवं. परिस्थिती स्विकारली आणि त्यात सुधार करण्यासाठी मेहनत घेतली तर यातूनही खेळाडू वर येऊ शकतो.” पहिल्या कसोटीआधी ऋषभ पंतवर विचारलेल्या प्रश्नाला अजिंक्यने उत्तर दिलं.

न्यूझीलंड दौऱ्यात ऋषभ पंतला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. २०१९ वर्षात विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत पंतला संधी दिली. मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात तो अपयशी ठरला. फलंदाजीतला खराब फॉर्म, यष्टींमागची ढासळती कामगिरी पाहता…भारतीय संघ-व्यवस्थापनाने सर्वात प्रथम कसोटी मालिकेत पंतला विश्रांती देत साहाच्या अनुभवाला पसंती दिली. मात्र तरीही पंतच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी लोकेश राहुलवर सोपवण्यात आली. त्यामुळे ऋषभ पंत अजिंक्यचा सल्ला मनावर घेतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.