एफसी हैदराबादचा आघाडीवीर रॉबिन सिंगला विश्वास

तुषार वैती, मुंबई</strong>

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सहाव्या पर्वासाठी एफसी हैदराबादची तयारी जय्यत झाली आहे. आतापर्यंत आम्हाला एकदाही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नसली तरी यंदा मात्र विजेतेपद मिळवण्याच्या इष्र्येनेच आम्ही मैदानात उतरू. मी आणि माझे सहकारी पूर्णपणे तंदुरुस्त असून अ‍ॅटलेटिको कोलकाताविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा इरादा आहे, असा विश्वास भारताचा आणि एफसी हैदराबादचा आघाडीवर रॉबिन सिंग याने व्यक्त केला.

‘आयएसएल’मधील सर्वच संघ बलाढय़ असून प्रत्येक सामन्यात तीन गुणांची कमाई करण्याचा आमचा प्रयत्न राहील. प्रत्येक संघ जय्यत तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार असून त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जवळपास साडेचार महिने ही फुटबॉलचा थरार रंगणार असला तरी तंदुरुस्त राहण्यावर माझा भर राहील, असेही रॉबिन सिंगने सांगितले. मुंबईत रंगलेल्या अ‍ॅडिडास टँगो फुटबॉल लीगप्रसंगी रॉबिनने आपल्या पुढील वाटचालीविषयी मते मांडली.

भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीविषयी रॉबिन म्हणाला की, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी चांगली होत आहे. उंचावता आलेख पाहिल्यास, भारताने अव्वल १०० देशांमध्येही स्थान मिळवले आहे. याचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटत आहे. राष्ट्रीय संघाला भविष्यात माझी गरज भासल्यास, सर्वतोपरी योगदान देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’’

२०१७मध्ये रंगलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचा भारताला कितपत फायदा झाला, याविषयी त्याने सांगितले की, ‘‘भारतात यापुढे जेवढय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील, त्याची जागतिक स्तरावर दखल घेतली जाईल. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनामुळे देशात फुटबॉलच्या प्रगतीला बळ मिळाले. या स्पर्धेद्वारे अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे आले आहेत. यापुढे तेच देशाचे भवितव्य आहेत. यापैकीच काही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील, अशी खात्री आहे. आता पुढील वर्षी महिलांचीही १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात रंगणार आहे. यामुळे महिला फुटबॉलला अधिक बळकटी मिळणार असून त्यांच्यासाठीही प्रगतीची दारे खुली होतील.’’

‘‘टाटा फुटबॉल अकादमीचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. या अकादमीमधून अनेक उदयोन्मुख फुटबॉलपटू देशाला मिळत आहेत. मी जेव्हा खेळत होतो, तेव्हा फक्त टाटा अकादमीचा लौकिक होता. आता गोव्यातील सेसा अकादमीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत फुटबॉलपटू घडवण्याचे काम करत आहेत. देशात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. यापुढे ही गुणवत्ता शोधून काढण्यासाठी अनेक स्पर्धाच्या आयोजनाची आवश्यकता आहे,’’ असेही त्याने सांगितले.