रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच अंतिम फेरीत भिडणार

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम थरार रंगणार असला तरी टेनिसशौकिनांसाठीही रविवारी मस्त मेजवानी असणार आहे ती स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात रंगणाऱ्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीची. त्यामुळे फेडरर वि. जोकोव्हिच यांच्यातील द्वंद्व आता पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. फेडरर नवव्या तर जोकोव्हिच आपल्या पाचव्या विम्बल्डन जेतेपदासाठी रविवारी सेंटर कोर्टवर उतरणार आहे.

आठ वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या ३७ वर्षीय फेडररने शुक्रवारी रात्री स्पेनच्या राफेल नदालचे आव्हान परतवून लावले. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या या सामन्यात फेडररने ७-६ (७/३), १-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत ३१ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिचने उपांत्य फेरीत स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा याचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. १५ ग्रँडस्लॅम विजेतेपदे आपल्या नावावर करणाऱ्या जोकोव्हिचने फेडररवर आतापर्यंत २५-२२ अशी सरशी साधल्यामुळे संपूर्ण टेनिसप्रेमींचे या महाअंतिम फेरीकडे लक्ष लागले आहे. विभिन्न शैली आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या दोघांनीही या स्पर्धेत आतापर्यंत दोन सेट गमावले आहेत. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचने फेडररला दोन वेळा हरवल्यामुळे या सामन्यातही त्याचेच पारडे जड मानले जात आहे.

  • रॉजर फेडररने १२ वेळा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. फेडररच्या नावावर विम्बल्डनची आठ विजेतेपदे आहेत.
  • ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा फेडरर हा तिसरा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. ३९ वर्षीय केन रोसवॉल यांनी १९७४मध्ये विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकावला होता.

विम्बल्डनमध्ये राफेलविरुद्ध खेळताना एक वेगळाच आनंद मिळतो. हा माझ्या सर्वाधिक आवडत्या सामन्यांपैकी एक होता. माझ्यावर प्रचंड दडपण होते. नदालनेही अप्रतिम खेळ करत कडवी झुंज दिली.  – रॉजर फेडरर