भारतीय कसोटी संघात रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी द्यावी का यावर गेले काही दिवस चर्चांना उधाण आलं आहे. विंडीज दौऱ्यात लोकेश राहुल सलामीला अपयशी गेल्यामुळे भारतीय संघात बदलाची गरज असल्याचं मत माजी खेळाडूंनी व्यक्त केलं होतं. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनीही रोहितला कसोटी संघात सलामीला संधी मिळू शकते असे संकेत दिले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या मते रोहित शर्मा भारतीय उपखंडात कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊ शकतो.

“भारतीय उपखंडात रोहित नक्कीच सलामीवीर म्हणून खेळू शकतो. तो कसोटीत अपयशी ठरेल असं मला वाटत नाही. मात्र दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात त्याला समस्या येऊ शकतात. मी आयपीएलमध्ये रोहितसोबत खेळलो आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. जर त्याने कसोटीत सलामीला येण्याचं आव्हान स्विकारलं तर तो यशस्वीरित्या पूर्ण करुन दाखवले.” बंगळुरुत एका कार्यक्रमात बोलत असताता गिलख्रिस्टने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – कसोटी संघात रोहितला जागा न मिळणं हा त्याच्यावर अन्याय – दिलीप वेंगसरकर

विंडीज दौऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. १५ सप्टेंबरपासून आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहेत.