भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी होणार आहे. याआधी खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. याच सामन्यात भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला तिसऱ्या वन डे सामन्यात खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी केवळ २६ धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे. विंडीजविरुद्धच्या या सामन्यात रोहितला भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर २१७ सामन्यांमध्ये ८ हजार ६७६ धावा जमा आहेत. त्याच्या या कामगिरीत एकूण २७ शतके आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर युवराजने काही काळापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने ३०४ एकदिवसीय सामन्यात ८ हजार ७०१ धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत युवराजला ‘ओव्हरटेक’ करण्याची संधी आहे. असे झाल्यास रोहित या यादीत सातव्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या या यादीत सचिन तेंडुलकर (१८ हजार ४२६), विराट कोहली (११ हजार ४०६), सौरव गांगुली (११ हजार ३६३), राहुल द्रविड (१० हजार ८८९), महेंद्रसिंग धोनी (१० हजार ७७३) आणि मोहम्मद अझरुद्दीन (९ हजार ३७८) हे आघाडीवर आहेत.

दरम्यान, युवराजने कारकिर्दीत आशिया इलेव्हन संघाकडून ३ सामन्यांत ९२ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडून त्याने केलेल्या धावा या ८ हजार ६०९ आहेत. त्यानुसार पाहिल्यास रोहितने युवराजला आधीच मागे टाकले आहे. विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या रोहितला या दौऱ्यात अद्याप दमदार खेळी करता आलेली नाही. पण गेल्या ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत रोहितने चांगली फलंदाजी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.