भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. बाळंतपणात आपल्या बायकोची काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने सुट्टी मंजूर केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला भारतीय कसोटी संघात स्थान दिलं आहे. विराटच्या अनुपस्थितीत उप-कर्णधार अजिंक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. परंतू भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणच्या मते विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या ऐवजी रोहीत शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व करावं.

“विराट पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. याचा भारतीय संघावर नक्कीच मोठा परिणाम होईल. पण आपल्याला विराटच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. क्रिकेटच्या पलिकडेही एक जग असतं आणि परिवारालाही तेवढंच महत्व द्यायला पाहिजे. विराट भारतीय संघात नसल्यामुळे मैदानावर त्याचा नक्कीच परिणाम जाणवेल.” इरफान पठाण पीटीआयशी बोलत होता. विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करायला हवं. मी रहाणेच्या विरोधात नाही. पण रोहितने स्वतःला कर्णधार म्हणून सिद्ध केलंय.

मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासोबत रोहितने भारतीय संघाला निदहास चषक आणि आशिया चषक जिंकवून दिला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्माची संघातली भूमिका महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियात खेळत असताना रोहितसारखा खेळाडू संघात असणं गरजेचं आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहेत.

अवश्य वाचा – अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटला रजा मंजूर, पहिल्या कसोटीनंतर परतणार माघारी