बंगळुरुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत असलेल्या रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतला सहभाग अनिश्चीत मानला जात आहे. ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लक्षात घेता रोहित आणि इशांतने पुढील २-३ दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होणं अपेक्षित होतं. परंतू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानूसार रोहित आणि इशांतच्या फिटनेसमध्ये म्हणावी तशी सुधारणा झालेली नसून ते ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता कमीच आहे. दोन्ही खेळाडू संघात कधी दाखल होतील याबद्दल बीसीसीआय आणि एनसीए ने भारतीय संघ व्यवस्थापनाला अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि इशांत यांना पुढील ३-४ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावं लागेल असं म्हटलं होतं.

युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. यानंतर तो काही सामने खेळला नव्हता. याच दुखापतीचं कारण देऊन सुनिल जोशी यांच्या निवड समितीने रोहितला भारतीय संघात स्थान दिलं नाही. परंतू भारतीय संघाची निवड झाल्यानंतर रोहितने सरावाला सुरुवात करुन अंतिम सामन्यातही बहारदार खेळी केली. ज्यामुळे संभ्रम वाढला आणि बीसीसीआयला रोहित आणि इशांतला भारतीय संघात सहभागी करावं लागलं. परंतू सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता असल्याचं दिसतंय.